परदेश शिष्यवृत्तीसाठी सहा लाखांची मर्यादा

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना लाभ मिळणार 

मुंबई

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे अनुसूचित जाती-जमातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा नसल्याने सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांनीदेखील या योजनेचा लाभ घेतल्याने, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची टीका होत होती. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारी 1 ते 300 पैकी पहिल्या 100 विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा नव्हती. 101 ते 300 पर्यंत 6 लाख रुपये इतकी उत्पन्न मर्यादा होती. परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या 1 ते 100 क्रमवारी असलेल्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक उत्पन्नाच्या अटीशिवाय लाभ देण्यात येत होता; परंतु यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना लाभ मिळतो. गोरगरीब व हुशार असलेले विद्यार्थी वंचित राहतात. यामुळे या शिष्यवृत्ती योजनेला केंद्र सरकार, ओबीसी विभाग तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या धर्तीवर सरसकट उत्पन्नाची मर्यादा घालावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार 1 ते 300 क्रमवारीमध्ये असणाऱ्या व लाभ मिळवण्यासाठी पात्र असलेल्या 75 विद्यार्थ्यांना क्रमवारीनुसार 6 लाखांच्या आत कौटुंबिक उत्पन्न असल्यावरच या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. याशिवाय पदव्युत्तर पदवी तसेच डॉक्‍टरेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना आता लाभ मिळणार आहे. 

पदवीसाठीची अट रद्द
परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2017 च्या निर्णयानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी त्याच अभ्यासक्रमातील पदवी असणे अनिवार्य होते; परंतु ही अटदेखील आता रद्द करण्यात आली असून, एखाद्या शाखेतील विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अन्य शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश दिला, तरी आता ही शिष्यवृत्ती योजना लागू असणार आहे.

संबंधित बातम्या