सोलापूरमधील गुरूजी झाले 'ग्लोबल टीचर'; ७ कोटी रूपयांचा पुरस्कार पटकावणारे रणजितसिंह डिसले पहिलेच भारतीय

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

मागील महिन्यात जगभरातून शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या 10 शिक्षकांमधून एकाला हा पुरस्कार देण्यात येणार होता. एकूण सात कोटी रूपये इतकी रक्कम असलेल्या या पुरस्काराची इंग्लंडमधील लंडन येथून घोषणा करण्यात आली.

पुणे- सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी ग्लोबल टीचर हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. मागील महिन्यात जगभरातून शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या 10 शिक्षकांमधून एकाला हा पुरस्कार देण्यात येणार होता. एकूण सात कोटी रूपये इतकी रक्कम असलेल्या या पुरस्काराची इंग्लंडमधील लंडन येथून घोषणा करण्यात आली.

रणजितसिंह यांनी क्यूआर कोडचा वापर करून थेट शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. तसेच शिक्षणात नवनवीन कल्पना त्यांनी विकसित केल्या. याबरोबरच विद्यार्थिनींसाठी त्यांनी विशेष कष्ट घेत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.      

रणजितसिंह यांनी एका खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रयत्न अत्यंत मोलाचे असून त्यांच्या प्रयत्नांमुळे गावातील कमी वयातच विवाहित होणाऱ्या मुलींची संख्या घटली. एवढेच नव्हे तर मुलींची शाळेतील हजेरी 100 टक्क्यांवर आणण्यात त्यांना यशही आले. ते शिकवत असलेल्या शाळेलाही नुकताच सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कारही मिळाला असून या शाळेतील 85 टक्के विद्यार्थी वार्षिक परिक्षेत 'अ' श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील एका विद्यार्थिनीला विद्यापीठातून पदवीधर होण्यासही यश आले असून काही काळापूर्वी जवळपास अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करण्यात रणजितसिंह यांचा मोलाचा वाटा असल्याचे या पुरस्काराच्या परीक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.  

दरम्यान, रणजितसिंह डिसले यांनी बोलताना सांगितले होते की,'आम्ही 2016मध्ये क्यूआर कोडेड पुस्तके चालू केल्यानंतर राज्य सरकारने यात लक्ष घालून केंद्राला या तंत्रज्ञानाच्या उपयोगितेबद्दल सांगितले. त्यानंतर केंद्रानेही आमच्या या तंत्राचा अभ्यास करण्यासाठी एक काही सदस्यांचा एक संघ पाठवला. त्या समितीने त्यावर 2018 मध्ये एक अहवाल तयार केला. एनसीईआरटीनेनंतर यानंतर त्यांच्या पुस्तकांमध्ये या क्यूआर कोडचा वापर कऱण्याचा निर्णय घेतला.'  

संबंधित बातम्या