कोविड रुग्णांसाठी विशेष ऍम्ब्युलस बे वॉर्ड

Dainik Gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

नायर रुग्णालयात अभिनव प्रयोग; एकाच ठिकाणी स्वॅब, एक्‍स-रे, रक्त तपासणी

मुंबई

कोरोना रुग्णांना तपासण्यांसाठी फिरायला लागू नये यासाठी नायर रुग्णालयात अभिनव प्रयोग सुरू केला आहे. येथे सुरू केलेल्या ऍम्ब्युलस बे वॉर्ड या ठिकाणी स्वॅब, रक्त तपासणी आणि एक्‍स-रे सर्व तपासण्या एकाच ठिकाणी होणार आहेत. कोव्हिड आजारातील ही इमर्जन्सी सेवा असल्याचे नायर रुग्णालयातील डॉ. विशाल रख यांनी सांगितले. 
निसर्ग चक्रीवादळाच्या धामधुमीतच ऍम्ब्युलस बे ही अत्यावश्‍यक सेवा सुरू केली. अचानक उद्‌भवलेल्या चक्रीवादळ स्थितीत सुरू असलेली कोव्हिड ओपीडी प्रभावित होणार असल्याने हा विभाग तासाभरातच त्वरित सुरू करण्यात आला. या ठिकाणीही पाणी साचेल, असे गृहित धरूनच येथे 1 ते दीड फूट उंचीचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. कित्येक वेळा अत्यवस्थेत येणारा रुग्ण रुग्णवाहिकेतच तपासला जात होता. आता रुग्णाला ऍम्ब्युलस बे इमर्जन्सी वॉर्डात घेऊन कोव्हिड तपासणी केली जाईल. या ठिकाणी ओपीडी ते व्हेंटिलेटर अशा सुविधा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. दर वर्षी उघडण्यात येणाऱ्या ओपीडीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते, याची कल्पना असल्याने उंची वाढवण्यात आली आहे. महिनाभर आधीच झालेल्या पावसाळी तयारी बैठकीत याचा विचार ठरला असल्याचे डॉ. रख सांगतात. 

काय आहे वैशिष्ट्य? 
15 खाटा आणि प्रत्येक खाटेवर ऑक्‍सिजन सिलिंडर
अत्यावस्थेत आणलेला रुग्ण इथे स्थिर करून वॉर्डात पाठवला जाणार आहे.

याआधी रुग्ण दाखल झाल्यावर एका ठिकाणी स्वॅब, दुसऱ्या ठिकाणी एक्‍स-रे तर तिसऱ्या ठिकाणी रक्त तपासणी अशा विविध तपासणीसाठी रुग्णाला फिरावे लागत असे. ऍम्ब्युलस बे अत्यवस्थ वॉर्डात मात्र सर्व तपासणी एकाच ठिकाणी होणार आहे. ज्यामुळे रुग्णांच्या फेऱ्या वाचतील. शिवाय रुग्णाला स्थिर करूनच वॉर्डात पाठवण्यात येईल.
- डॉ. विशाल रख, नायर रुग्णालय.

संबंधित बातम्या