"एसटी' बघतेय प्रवाशांची वाट !

Dainik Gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

विभागातून दिवसभरात पंधराच फेऱ्या; मालवाहतुकीलाही अल्प प्रतिसाद

जळगाव

बाहेर गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीत उत्तम पर्याय असलेली राज्य परिवहन महामंडळाची "एसटी'ला प्रवाशांची प्रतीक्षा आहे. प्रवासी आणि महामंडळ यांच्यात एक वेगळे नाते मानले जातेय. म्हणूनच लालपरी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरली आहे. ऐरवी एसटीची प्रतीक्षा करत थांबणाऱ्या प्रवाशांचीच वाट पहात थांबावे लागत आहे. 
कोरोना व्हायरसमुळे दोन- अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमुळे "एसटी'ची चाके देखील थांबलेली आहेत. यातून बाहेर निघण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू करण्याचे आदेश होते. परंतु, प्रवासी मिळत नसल्याने बस रिकाम्या फिरत आहेत. यामुळे मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत देखील काही प्रवासी फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

दिवसभरात पंधरा फेऱ्या
पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा अंतर्गत प्रवासी बसफेऱ्या सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर जळगाव विभागाकडून फेऱ्या सोडण्यात येत होत्या. सुरवातीला अडीचशे ते दोनशे फेऱ्या सोडण्यात येत असताना यातून केवळ तीनशे ते साडेतीनशे प्रवासी जात होते. यामुळे नफा कमी तोटा जास्त अशी स्थिती "एसटी'ची झाली होती. प्रवासी मिळत नसल्याने फेऱ्या कमी कराव्या लागल्या असून, आता दिवसभरातून केवळ पंधरा फेऱ्या सुरू आहेत.

मालवाहतुकीलाही प्रतिसाद अल्प
प्रवासी वाहतूक करणारी "एसटी' ही मालवाहतूक ट्रक झाली. गेल्या आठवड्यात जळगाव विभागातून यवतमाळसाठी पहिली फेरी मिळाल्यानंतर सेवेचा शुभारंभ झाला. परंतु, याला मिळणारा प्रतिसाद देखील अल्प असून, आतापर्यंत केवळ वीस- पंचवीस मालवाहतुकीच्या फेऱ्या झाल्या आहेत. यामुळे या फेऱ्यांमधून देखील उत्पन्न फारसे मिळत नाही.

संबंधित बातम्या