राज्यातील एसटी कर्मचारी वाऱ्यावर

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

अडचणी दूर करण्याची राज्य एसटी कामगार संघटनेची मागणी

मुंबई

आंतरराज्य व राज्याच्या सीमेपर्यंत मजूर, विद्यार्थी यांची वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीदरम्यान कर्मचाऱ्यांना आवश्‍यक वैद्यकीय सुविधा, सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात देण्यात आलेली नाहीत. कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय, जेवणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. परिणामी अत्यावश्‍यक सेवेत कर्तव्य बाजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच देण्याची मागणी एसटी महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र पाठवून करण्यात आली आहे.
शासनाने अटी व शर्तीच्या अधीन राहून रेड झोन वगळता एसटीची वाहतूक सुरू करण्यास जिल्हा अंतर्गत परवानगी दिली आहे; मात्र वाहतूक करताना दिलेल्या अटी व शर्तीचे पालन अनेक ठिकाणी करण्यात येत नसून, शासकीय सूचनांची पायमल्ली संबंधित प्रशासनाकडून होत आहे. कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित व परिपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जात नाही, शिवाय त्यांना 50 लाखांचे विमा कवचही नाही.
एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. काही विभागात रेड झोनमधून कामगिरी करून आलेल्या कर्मचाऱ्यांना थेट घरी पाठवण्यात येते. त्यामुळे कर्मचारी बाधित असल्यास त्याच्या कुटुंबालासुद्धा त्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे रेड झोन व कंटेन्मेंट झोनमध्ये काम करणाऱ्या किंवा काम करून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्ट होणे आवश्‍यकच असल्याची मागणीसुद्धा राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या