तामिळनाडूमधील उद्योजकाच्या मदतीने बांबूच्या सुतापासून पायमोज्यांची निर्मिती

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

नवउद्योजक नवीनकुमार माळी यांनी तामिळनाडूमधील उद्योजकाच्या मदतीने बांबूपासून सूत तयार करून त्यापासून पायमोजे बनविण्याचे स्टार्ट अप्‌ सुरू केले आहे

कोल्हापूर: येथील नवउद्योजक नवीनकुमार माळी यांनी तामिळनाडूमधील उद्योजकाच्या मदतीने बांबूपासून सूत तयार करून त्यापासून पायमोजे बनविण्याचे स्टार्ट अप्‌ सुरू केले आहे. हे पायमोजे नैसर्गिक साधन सामुग्रीपासून उपलब्ध कच्च्या मालापासून बनविलेले आहेत.  तब्बल चोवीस तासही पायमोजे परिधान केले तरी त्वचेला त्रास होणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

माळी म्हणाले,की गोकुळ शिरगावला बांबूपासून वस्तू बनविण्याचा माझा कारखाना होता. त्यातून तमीळनाडूतील उद्योजकाची ओळख झाली. त्यांची बांबूपासून विविध कपडे तयार करण्याची फॅक्‍टरी आहे. पुढे मीही या व्यवसायात करिअर करण्याचा विचार त्यांना बोललो. ते तयार करत नसलेला प्रकार मी बनवावा असे आमच्या दोघात ठरले, अन्‌ असा एकच प्रकार होता, तो म्हणजे पायमोजे. त्याला तुलनेने गुंतवणूक कमी होती.

गुंतवणूक, मशिनरी, कुशल कामगार, कच्चा माल हे सारे कसे जमवले यावर माळी म्हणाले, ‘‘पूर्वी मी एका खासगी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होतो. त्यामुळे माझी वैयक्तिक बचत होती. काही मशिनरी जुन्या मिळवल्या, तर काही मशिनरी तैवानमधून नवीन मागवल्या. या मशिनरी खूपच अत्याधुनिक असल्याने याला कामगारच लागत नाहीत. कच्चा माल तामीळनाडूतून घेत आहे.’’

आणखी वाचा: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्रॅम अकाऊंट हॅक -

बांबूच्या पायमोजाचे फायदे

  •  पायमोजे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असल्यामुळे त्वचेसाठी चांगले
  •  वजनाच्या तिपटीपेक्षा जास्त पाणी शोषून घेण्यासाठी  पायमोजे सक्षम आहेत. त्यामुळे त्वचा थंड व कोरडी ठेवण्यास मदत करतात.
  •  अन्य कापडांपेक्षा हे पायमोजे मऊसूत असून ते धुता येतात.
  •  दिवसभर वापरले तरी पायांना त्रास होत नाही, हा ग्राहकांचा अनुभव आहे.
  •  एका संशोधनानुसार हे पायमोजे ७० टक्के वासविरहीत आहेत.

 

सध्या मशिनच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी उत्पादन घेत आहे. त्यामुळे मालाची किंमत सर्वसामान्यांना जास्त वाटावी अशी आहे. या स्टार्ट अपला प्रतिसाद लाभला तर मशिनच्या क्षमतेनुसार उत्पादन घेता येऊन मालाचे निर्मिती मूल्य कमी होऊन विक्री किंमतही घटू शकेल.  संकेतस्थळाबरोबरच फेसबुक, व्टिटरवरही पायमोज्याची छायाचित्रे, माहिती शेअर करत आहे.
 - नवीनकुमार माळी, नवउद्योजक 

 

संबंधित बातम्या