महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या- नीलम गोऱ्हे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

महिलांना प्रतिकूल परिस्थितीत गरज भासल्यास स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्र देता येतील का, याचाही विचार व्हावा, अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत केली. 
 

मुंबई- महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सध्याचा काळ बिकट असल्याची परिस्थिती सर्वत्र आहे. स्त्रियांना रोज अनेक अत्याचारांना सामोरे जावे लागते. रोज घडणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी संबंधित सर्व विभागांची बैठक घेतली. शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारची बैठक घेण्याची विनंती गृहमंत्र्यांकडे केली होती. या बैठकीत महिलांच्या संरक्षणासाठी नव्याने अंमलात येणारा दिशा कायदा आणि सध्या असित्त्वात असलेले कायदे यावर चर्चा झाली. गरज भासल्यास महिलांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्र देता येतील का, याचाही विचार व्हावा, अशी सुचना नीलम गोऱ्हे यांनी या बैठकीत केली. 

सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर असताना आता पीडित महिलांना न्याय देण्यासाठी त्यांची आणि पुराव्याची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे, त्यासाठी महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीही गोऱ्हे यांनी केली आहे.

स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांची चौकशी योग्य रितीने झाली पाहिजे. त्यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही यावेळी त्या म्हणाल्या. महिलांसाठी पोलिसांनी नवीन हेल्पलाईन सुरु केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. सायबर गुन्ह्या संदर्भात 66 'अ' कलम हे अजामीन पात्र करण्याबाबत देखील कायद्यात तरतूद करण्याची मागणी गोऱ्हे यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या