राज्यात कोरोनाचा हाहाकार! एका दिवसांत 28,699 रुग्णांची नोंद; मृत्यूसंख्याही सर्वाधिक 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

देशात बुधवारी एका दिवसांत  47 हजार 262 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 275 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 20% सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण झपट्याने वाढत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी  राज्यात अनेक जिल्हे पुन्हा लॉकडाऊन  करूनही रुग्णांमध्ये होणारी वाढ थांबण्याची कोणतीही चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीयेत. आता याहून  धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील  सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ झाली आहे. तर देशात बुधवारी एका दिवसांत  47 हजार 262 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 275 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 20% सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.  महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यात  कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली  असून याठिकाणी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. महाराष्ट्राची परिस्थिती तर फारच गंभीर आहे.  

गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात  28,699 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पंजाबमध्ये 2,254 कर्नाटकात 2,010 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात जास्त म्हणजे 132 कोरोनाबाधित रुग्ण मरण पावले. तर त्या खालोखाल पंजाब 53 आणि छत्तीसगडमध्ये  20 रुग्णांचा मृत्यू झाला.  मात्र  तुलनेने, ज्या राज्यांमध्ये कोविड -19  प्रकरणांची संख्या वाढत किंवा कमी होत नाही, तेथे मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. 24 मार्चच्या सकाळपर्यंत, अशी 12 राज्ये होती जिथे एकही कोविड -19 रुग्ण मरण पावला नाही. यामध्ये ओडिशा, लक्षद्वीप, लडाख, मणिपूर, दादरा आणि नगर हवेली, मेघालय, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान-निकोबार, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

15 फेब्रुवारीपासून परिस्थिती अधिकच बिघडली. 

सरकारी अधिकारी तज्ञांच्या मते, राज्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर, कोरोना संपल्याचे लोकांनी गृहीत धरले. कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळेच कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा प्रचंड वाढ झाली. ज्याचा परिणाम म्हणजे आज महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ढकलला गेला. आकडेवारीनुसार, 15 फेब्रुवारी नंतरच भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली असून आठवड्याला नव्या रुग्णांची संख्याही वाढल्याचे दिसत आहे.  1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 80,180 प्रकरणे नोंदवली गेली, तर 15-21 फेब्रुवारी दरम्यान 86,711 नवीन प्रकरणे नोंदली गेली.  तर त्यापुढच्या आठवड्यात नवीन प्रकरणांचा एक लाखांचा टप्पा ओलांडला आणि 15 ते 21 मार्चदरम्यान ही दोन लाखावर रुग्णसंख्या पोहचली. तर  या काळात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली. मार्च 15-21 दरम्यान, मृत्यूने 1000 च्या आकडा ओलांडला आणि मागील आठवड्याच्या तुलनेत  34.9% वाढ झाली. मागील वर्षी 17 मार्च रोजी महाराष्ट्रात कोरोनाने पहिलं बळी घेतला. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाने 53,589 बळी घेतले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव देखील येथे सर्वाधिक आहे. गेल्या काही काळात  रुग्णसंख्येत महाराष्ट्रात 50% ते 60% नव्याने वाढ झाली आहे.  त्याच वेळी, दैनंदिन मृत्यूंमध्ये 40% पेक्षा जास्त आहे. 

Goa Corona Update: गोव्यात एका दिवसात 133 ‘कोरोना’बाधित

मृत्यूच्या बाबतीत भारत चौथ्या स्थानावर

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जगात अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत  कोरोनाने 5.46 लाख बळी घेतले आहेत. त्यापाठोपाठ ब्राझील 2.99 लाख, मेक्सिको 1.99 लाख आणि त्यानंतर भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतात आतापर्यंत 1.60 लाख मृत्यूची नोंद झाली आहे. यानंतरही, जर आपण दर एक लाख लोकसंख्येच्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केली तर भारतातील परिस्थिती खूप चांगली आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे केवळ 11.61 मृत्यू आहेत. त्याच वेळी, यूकेमध्ये 185 अमेरिकेत162, इटलीमध्ये174 , स्पेनमध्ये 157  आणि मेक्सिकोमध्ये 153 लोक दर एक लाख लोकसंख्येमध्ये मरण पावले.
 

संबंधित बातम्या