स्थगितीची मागणी, अंमलबजावणीचे उत्तर!

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

केंद्रीय नियमावलीबाबत राज्याचे गणेशोत्सव समितीला पत्र

मुंबई

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पीओपीवरील बंदीबाबतच्या नियमावलीला या वर्षी स्थगिती देण्याची मागणी राज्य पर्यावरण मंत्र्यांकडे ई-मेलद्वारे केली होती, परंतु राज्य पर्यावरण विभागाने या नियमावलीची अंमलबजावणी करावी असे उत्तर दिले. त्यामुळे समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली असून, पर्यावरण मंत्र्यांपर्यंत आमचे पत्र पोहोचले का, अशी शंकाही व्यक्त केली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) गणेशोत्सव मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व घरगुती उत्सव साजरा करण्याबाबत सुधारित नियमावली जाहीर केली. त्यानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मूर्तिकारांना शाडूची माती व कच्चा माल उपलब्ध झालेला नाही. शाडूच्या मूर्ती घडवण्यासाठी पुरेसा वेळ नाही. या पार्श्‍वभूमीवर नव्या नियमावलीमुळे मूर्तिकारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सध्याच्या परिस्थितीत मुंबईचे गणेश मूर्तिकार व मंडळांना केंद्राच्या नियमावलीतून सूट द्यावी व 2021 मधील गणेशोत्सवापूर्वी बैठक घेऊन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित नियमांबाबत अंतिम निर्णय घ्यावा, अशी विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पर्यावरण मंत्र्यांना ई-मेलद्वारे केली होती.
पर्यावरण विभागाकडून विरोधाभास दर्शवणारे उत्तर मिळाल्यामुळे समन्वय समितीने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. स्थगितीची मागणी असताना अंमलबजावणी करण्याचे उत्तर देण्यात आले. हा पर्यावरण मंत्र्यांचा अंतिम निर्णय आहे का, असा सवाल समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड्‌. नरेश दहिबावकर यांनी केला. हे उत्तर अंतिम असल्यास शाडूच्या मूर्ती घडवण्यासाठी कच्चा माल आणि जागेचा प्रश्‍न आहे. पेण-पनवेल येथे पीओपीच्या हजारो मूर्ती तयार आहेत; त्यांच्या नुकसानाचे काय, अशी विचारणाही त्यांनी केली. केंद्राच्या नियमावलीतून या वर्षी सवलत मिळावी, 2021 मधील उत्सवापूर्वी बैठक घेऊन सुधारित नियमांबाबत अंतिम निर्णय घ्यावा, या मागणीचा पुनरुच्चार पत्र पाठवून करण्यात आला आहे.

राज्य पर्यावरण विभागाकडून अशा विरोधाभासी उत्तराची अपेक्षा नव्हती. आमच्या मागणीबाबत राज्य पर्यावरण विभाग निर्णय घेऊ शकत नसल्यास तसे स्पष्ट करावे. राज्य सरकारने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून नियमावलीला स्थगिती देण्याबाबत विनंती करावी, आमच्या समस्या मांडाव्यात. याबाबत तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांनी लवकर बैठक घेणे आवश्‍यक आहे.
- ऍड्‌. नरेश दहीबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

संबंधित बातम्या