सिंधुदुर्गला वादळाचा तडाखा

Dainik Gomantak
बुधवार, 13 मे 2020

वादळी पावसादरम्यान धावत्या रिक्षावर झाड पडून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. कोलगाव आरटीआयसमोर सायंकाळी ही घटना घडली. अतुल पद्माकर माणकेश्‍वर (वय 55, रा. कोलगाव निरूखे) असे जखमीचे नाव आहे.

सावंतवाडी

सिंधुदुर्गाच्या बहुसंख्य भागाला वादळाचा तडाखा बसला. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, माणगाव खोरे भागात पावसासह वादळाची तीव्रता जास्त होती. यात कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महावितरणला सर्वाधिक फटका बसला.
जिल्ह्यात पंधरवड्यात उष्मा वाढला होता. काही काळ ढगाळ वातावरण होते; मात्र शिडकावा होत नव्हता. जिल्हावासीयांना अखेर पावसाने अनुभूती दिली. सायंकाळी चारच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल सुरू झाले. साडेचारच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. तासभर झालेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे बऱ्याच भागात झाडे तसेच फांद्या मोडून पडल्या. वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. 
सुरवातीला जोरदार वादळाने तडाखा दिला. गडगडाटाच्या आवाजाने पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेगमीच्या कामांना वेग आला आहे. घरांची दुरुस्ती तसेच कौले परतणे, साफसफाई करणे, खरिपाची पूर्वतयारी, शेतातील तण काढणे आदी कामांना वेग आला आहे. त्यातच वादळ आणि पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.
वादळाने जिल्ह्यात काही ठिकाणी छोटी-मोठी पडझड झाली. खासकीलवाडा भागात तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. त्यामध्ये खासकीलवाड्यामध्ये घराच्या दर्शनी भागावर मोठे झाड कोसळले. शिल्पग्राम येथे जाणाऱ्या मार्गावरही झाड कोसळले. अन्य ठिकाणी मोठी झाडे कोसळली. यामुळे शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला. दोडामार्ग तालुक्‍यातही पावसाने तडाखा दिला. मोरगाव परिसरात नुकसानाची तीव्रता अधिक होती. काहींच्या घरावरील छप्पर उडून गेले. दोडामार्गच्या इतर भागातही हानी झाली.
माणगाव खोऱ्यात झाडे पडून नुकसान झाले. बांदा परिसरातही नुकसानाची तीव्रता जास्त होती. अनेक ठिकाणी झाडे पडून महावितरणच्या वीजवाहिन्या तुटल्या.

धावत्या रिक्षावर झाड पडून
कोलगावात चालक जखमी

वादळी पावसादरम्यान धावत्या रिक्षावर झाड पडून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. कोलगाव आरटीआयसमोर सायंकाळी ही घटना घडली. अतुल पद्माकर माणकेश्‍वर (वय 55, रा. कोलगाव निरूखे) असे जखमीचे नाव आहे. कोलगाव परिसरात वादळी पाऊस सुरू होता. याच दरम्यान कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या तीनआसनी रिक्षावर झाड कोसळले. रिक्षाचालक माणकेश्‍वर गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्‍याला व हाताला दुखापत झाली. दैव बलवत्तर म्हणून रिक्षामधील युवती बचावली. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अपघात होताच तेथील सुरेश दळवी, श्रीपाद केनवडेकर, बाळा दळवी, रवी परांजपे यांनी टेम्पोतून जखमी माणकेश्‍वर यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

संबंधित बातम्या