सुिंधुदुर्गाला वादळी पावसाचा तडाखा

अवित बगळे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

सावंतवाडीत जास्त हानी; संततधारेमुळे पूरस्थितीचा धोका

वैभववाडी

जिल्ह्याच्या बऱ्याच भागाला आज वादळी पावसाने झोडपले. यात सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक हानी झाली. वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून लाखोंचे नुकसान झाले. काही भागात वाहतूकही विस्कळीत झाली. नदी, नाले धोक्‍याची पातळी गाठून वाहत आहेत.
जिल्ह्यात काल (ता.3) रात्रीपासून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. सरीवर सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील अनेक नदीनाले दुथडी वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती होण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली. वीजखांब, वाहिन्या उन्मळून पडल्यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित आहे. छप्पराचा पत्रा अंगावर पडल्यामुळे सावंतवाडी एक जखमी झाला.
दडी मारलेला पाऊस एक ऑगस्टपासून पुन्हा सक्रिय झाला. दोन दिवस रिमझिम पडल्यानंतर रविवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. सोमवार (ता.3) रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. सकाळपासून जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. सावंतवाडीला तडाखा बसला. शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या छपराचे पत्रे उडाले. यातील एक पत्रा अंगावर पडून एकजण जखमी झाला. एका गाडीवर झाड कोसळले. मालवण तालुक्‍यातही वादळी वारे वाहत आहेत. येथे दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. शहरातील काही भागांतील वीजवाहिन्या तुटून पडल्या. त्यामुळे वीज खंडित झाली आहे. वैभववाडी आणि कणकवली तालुक्‍यात जोर अधिक आहे. त्यामुळे तेथील नद्या दुथडी वाहत आहेत. वाऱ्यामुळे काही गावांमधील वीज सोमवारी रात्रीपासून खंडित आहे. वैभववाडीत दिवसभरात अनेकदा वीज खंडित झाली. कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसापेक्षा लोकांना वादळी वाऱ्याची भीती वाटत आहे.

जिल्ह्यात दोन दिवस मुसळधारेची शक्‍यता
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार जिल्ह्यात 5 व 6 ऑगस्टला तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. मालवण ते वसई या समुद्र किनारी 3.3 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या कालावधीमध्ये सुमारे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, समुद्र खवळलेला राहणार आहे. त्या अनुषंगाने मच्छीमारांनी या कालावधीमध्ये मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या