लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि महाराष्ट्राची चांगलीच जुंपली

दैनिक गोमन्तक
बुधवार, 7 एप्रिल 2021

देशभरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण पुन्हा सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

देशभरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण पुन्हा सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. देशातील महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, केरळ आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे आढळून येत आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त कोरोनाची नवी संक्रमित प्रकरणे महाराष्ट्रात सापडत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसींची कमतरता असल्याचे म्हणत केंद्र सरकारकडून लसींची मागणी केली होती. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी उत्तर देताना, महाराष्ट्राचा लस कमतरतेचा आरोप हा पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. 

मी सीआरपीएफचा आदर करते, पण भाजपच्या सीआरपीएफचा नाही: ममता बॅनर्जी

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात लसींचे फक्त 14 लाख डोस शिल्लक असल्याचे नमूद करत, केंद्र सरकारला दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. तसेच हीच परिस्थिती कायम राहिल्यास राज्यातील लसीकरण हे फक्त तीनच दिवस सुरु ठेवता येणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले होते. याशिवाय, केंद्र सरकारकडून लसींच्या पुरवठ्याचा वेग हा कमी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांची विधाने फेटाळून लावत महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

डॉ हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून मागील वर्षभरापासून कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्र सरकारचा गैरव्यवहार व आकस्मिक दृष्टिकोन याबद्दल आपण साक्षिदार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे कोरोनाच्या लढ्यात देशाच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याचा गंभीर आरोप देखील आरोग्य मंत्र्यांनी केला आहे. इतकेच नाही तर, जबाबदारीने कार्य करण्याची महाराष्ट्र सरकारची असमर्थता समजण्यापलीकडची असल्याचे डॉ हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त, जनतेत भीती पसरवणे म्हणजे मूर्खपणाचे असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.

Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानंतर आता पंजाब सरकारने...

त्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी लस पुरवठ्याबाबत रिअल-टाइम आधारावर परीक्षण केले जात असल्याचे अधोरेखित करत, राज्य सरकारांना याबद्दल नियमितपणे माहिती दिली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय, काही राज्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी आणि जनतेत दहशत पसरवण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे म्हणत डॉ हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. यानंतर, आरोग्य सेवा आणि कोरोना लढ्यातील अग्रभागी सेवकांना लसी देण्याच्या संदर्भात देखील महाराष्ट्र सरकारची कामगिरी आशादायक नसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकार वैयक्तिक वसुलीच्या फायद्यासाठी म्हणून राज्यातील जनतेला संकटात टाकत असल्याची जहरी टीका आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केली आहे.  

संबंधित बातम्या