अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

मुंबई पोलिसांबाबत संभ्रमित वृत्त दिल्याच्या आरोपात फौजदारी फिर्याद दाखल केलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने आज झटका दिला.

मुंबई : मुंबई पोलिसांबाबत संभ्रमित वृत्त दिल्याच्या आरोपात फौजदारी फिर्याद दाखल केलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने आज झटका दिला. या एफआयआर विरोधात केलेली याचिका प्रथम मुंबई उच्च न्यायालयात करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

रिपब्लिक टीव्हीच्या आऊटलिअर मीडिया कंपनीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी टीव्ही आणि वृत्त निवेदिकेसह काही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात गोस्वामी यांनी न्यायालयात याचिका केली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. संबंधित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करावी, असे स्पष्ट करत न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. 

फेक टीआरपी प्रकरणात पोलिस विभागात असंतोष आहे आणि पोलिस आयुक्तांबाबत नाराजी आहे. त्यांचे आदेश कोणी ऐकत नाही, अशा स्वरूपाचे वृत्त रिपब्लिक वाहिनीवर देण्यात आले होते. त्यामुळे पोलिस दल आणि नागरिकांमध्ये पोलिसांबाबत संभ्रमित अवस्था निर्माण झाली, अशी तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे. यामध्ये वृत्त संपादिका सागरिका मित्रा, निवेदिका शिवानी गुप्ता यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या