रिया चक्रवर्तीच्या भावासह वडिलांची चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

लवकरच रियालाही समन्स बजावण्याची शक्‍यता

मुंबई: रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची गुरुवारी सीबीआयने चौकशी केली. दुसरीकडे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तिच्या वडिलांची चौकशी केली. अमली पदार्थांसंबंधी नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोही (एनसीबी) रियाला लवकरच समन्स पाठवण्याची शक्‍यता आहे. 

सीबीआयने इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची प्रथम चौकशी केली आहे.रियाच्या सांताक्रूझमधील घरातून मुंबई पोलिसांनी रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना ईडीच्या चौकशीसाठी नेले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना एका खासगी बॅंकेच्या शाखेत नेण्यात आले. लॉकरच्या चाव्या आणण्याचेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

सुशांत आणि रिया यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा संचालक राकेश अस्थाना यांनी केला होता. त्यानंतर रियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही अस्थाना यांनी दिली आहे. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण गंभीर झाले आहे.

पोलिस आयुक्तांच्या बडतर्फीसाठी माेदींना पत्र
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी न केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना पदच्युत करा, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. आज पंतप्रधानांना त्यांनी पाठवलेले पत्र सुशांतसिंग तपास प्रकरणाला मिळालेले नवे वळण मानले जाते आहे. वांद्रे विभागाचे प्रमुख अभिषेक त्रिमुखे यांनाही सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे. 

क्‍लब कल्चरचा बळी! 
भाजपचे अन्य एक नेते आशीष शेलार यांनी सुशांतचा बळी ड्रग्ज आणि क्‍लब कल्चरने घेतला, असा आरोप केला आहे. अशा कल्चरची पाठराखण करणारे कोण... सर्व सत्य समोर येईलच, असे ट्‌विट शेलार यांनी केले आहे. नाईटलाईफचा पुरस्कार शिवसेना नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे शेलार यांच्या टिकेला वेगळी धार असल्याचे मानले जाते.

संबंधित बातम्या