स्तनाच्या कर्करोगाचा कालावधी आणि खर्चही होणार कमी; टाटा रुग्णालयाचे संशोधन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

‘एचइआर २’ हा स्तनाचा कर्करोग देशातील २५ टक्के लोकांमध्ये आढळतो. स्तनाच्या कर्करोगाबाबत नव्याने समोर आलेल्या उपचार पद्धतीमुळे एका वर्षाचा कालावधी थेट तीन महिन्यांवर आला आहे. - डॉ. राजेंद्र बडवे, संचालक, टाटा मेमोरियल रुग्णालय

मुंबई: मुंबईतील परळ येथील टाटा रुग्णालयाने केलेल्या संशोधनानुसार,  स्तनाचा कर्करोग आता केवळ तीन महिन्यांच्या औषधोपचारांनीच बरा होऊ शकणार आहे. यामुळे औषधांवरील खर्चही कमी होणार आहे. रुग्णालयाने ११ हजार रुग्णांवर केलेल्या चाचणीतून हा निष्कर्ष काढला आहे. 

टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, ‘एसीटीआरईसी’चे संचालक डॉ. सुदीप गुप्ता आणि टाटा रुग्णालयातील डॉक्‍टर गेल्या १५ वर्षांपासून यावर संशोधन करत होते. ट्रॅस्टुझुमॅब हे औषध स्तन कर्करोगावर प्रभावी मानले जाते. मात्र, यात दोन त्रुटी होत्या. एक तर हे औषध महागडे होते. तसेच हे औषध वर्षभरासाठी घ्यावे लागत होते. मात्र, टाटा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी विकसित केलेल्या नव्या उपचार पद्धतीमुळे हे औषध आता केवळ तीन महिने घ्यावे लागणार आहे, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. औषधाच्या मूळ ब्रॅंडची किंमत ८ ते १० लाख रुपये असून ते सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.

सामान्यांना फायदा
नवी उपचार पद्धती तीन महिन्यांचीच असल्याने स्तनाच्या कर्करोगावरील ट्रॅस्टुझुमॅब हे औषध सर्वसामान्यांना खरेदी करता येऊ शकेल. या अभ्यासातून हृदयावरही जास्त विपरीत परिणाम झाल्याचे आढळले नाही, असे डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या