वधूविनाच नवरदेव अन्‌ वऱ्हाडी परतले

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

हळदीच्या कार्यक्रमातच नवरदेवाच्या भावाचा पॉझिटिव्ह अहवाल

शिलापूर

पळसे शिवारातील नाशिक साखर कारखाना रोडवर गुरुवारी (ता. 28) लग्न ठरले, तर बुधवारी (ता. 27) सायंकाळी हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आणि याच वेळी नवरदेवाच्या मोठ्या भावाबद्दल धक्कादायक बातमी आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे वऱ्हाडी मंडळींमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यानंतर लग्न लावून सप्तपदी तर पूर्ण केली, मात्र वधूला बरोबर न घेताच नवरदेव आपल्या घरी परतले. अशा परिस्थितीत प्रत्येकाने लग्नघरातून काढता पाय घेतला.

बातमी समजताच वऱ्हाडी फिरले माघारी
औरंगाबाद मार्गावरील शिलापूर येथील युवकाचा पुणे महामार्गावरील पळसे शिवारातील नाशिक साखर कारखाना मार्गावर गुरुवारी विवाह होता. बुधवारी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच, नवरदेवाच्या मोठ्या भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. नवरदेवाचा भाऊ कोरोनाबाधित असल्याचे समजताच वऱ्हाडी मंडळींत भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत प्रत्येकाने लग्नघरातून काढता पाय घेतला. नवरदेवाच्या भावाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच तपासणी होऊन नवरदेवालाही क्वारंटाइन व्हावे लागणार असल्याने गुरुवारी सकाळी अवघ्या पाच-सहा लोकांच्या साक्षीने वधू-वरांनी सप्तपदी
करून घेतली. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सप्तपदीनंतर वधूला पुन्हा तिच्या माहेरी पाठवून सोबत न आणताच नवरदेव घरी परतले.

यंत्रणा मात्र सतर्क
नवरदेवाच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच ऐन हळदीचा कार्यक्रम सुरू असताना वऱ्हाडी मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र गुरुवारी सकाळी सातलाच मोजक्‍या पाच-सात लोकांच्या साक्षीने सप्तपदी झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सावधगिरीचे पाऊल उचलत वऱ्हाडी मंडळी नवरीला न घेताच आपल्या घरी परतल्याची घटना नाशिक रोडजवळील पळसे येथे घडली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या भावाचा विवाह जरी पार पडला असला, तरी शासकीय यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे.
गावात तातडीने फवारणी झाली. गावात लोकांना संदेश पाठवून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथक, पोलिस, महसूल अधिकारी, प्रशासकीय पातळीवर माहिती घेणे सुरू केले आहे.

शिलापूर गाव आणि परिसरातील सर्व दुकाने व व्यवसाय तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. मळे परिसरासह सर्वत्र औषध फवारणी करण्यात आली. अशा परिस्थितीत कोणीही घराच्या बाहेर पडू नये व स्वतःची काळजी घ्यावी.
-विश्‍वनाथ कहांडळ, उपसरपंच, शिलापूर, ता. नाशिक

 

 

संबंधित बातम्या