कृषी विधेयकांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात शेतकरी संघटनांचा एल्गार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी त्यांच्या घरासमोर कृषी विधेयकाची होळी केली. तसेच सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी केली.

पुणे: केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी आणि पणन सुधारणाविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व किसान युनियनने शुक्रवारी (ता.२५) ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पक्ष, किसान सभा, कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांनी सहभागी होत ठिकठिकाणी आंदोलने केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत अखिल भारतीय किसान संघाने या विधेयकांना विरोध करत, काही बदल सुचविले आहे. 

कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी त्यांच्या घरासमोर कृषी विधेयकाची होळी केली. तसेच सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी केली. दरम्यान शेतकरी , शेतमजूर , मच्छीमार , फळ बागायत शेतकरी , कामगार या सर्वांना एकत्रित करून दक्षिण भारतातील चळवळ मजबूत करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष भाषातज्ञ गणेश देवी यांनी शेट्टी यांची भेट घेत, आंदोलनाला पाठिंबा दिला.

अकोले (जि. नगर) येथे किसान सभा व अन्य पक्ष संघटनेतर्फे किसान सभेचे नेते डॉ अजित नवले, आमदार किरण लहामटे यांनी विधेयकांची होळी करुन निषेध केला. नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निदर्शने करत रास्ता रोको अंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर प्रतीकात्मक होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. 

रयतक्रांतीची गुढी
पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी (ता.हवेली) येथे रयतक्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.२५) केंद्र सरकारच्या कृषी पणन विधेयकांच्या समर्थनार्थ गुढी उभारण्यात आली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या