सिंधुदुरर्गात तिघे कोरोनामुक्त

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

जिल्ह्यात आणखी तिघे कोरोनामुक्‍त, रुग्णसंख्या घटली; आजअखेर 114 रुग्ण कोरोनामुक्‍त

ओरोस

जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. आज नव्याने तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. परिणामी जिल्ह्यात 114 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज आणखी दोन बाधित आढळले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 41 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयातून आज 29 नमुने तपासणीसाठी पाठविले. रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये कुडाळ आणि कणकवली तालुक्‍यातील प्रत्येकी एकजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सध्या 6 बाधित, तर 19 संशयित रुग्ण आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 30 बाधित आणि एक संशयित आहे. कोविड केअर सेंटरमध्ये तीन पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यातील चार हजार 193 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. सध्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 14 हजार 893 व्यक्ती आहेत. शासकीय संस्था क्वारंटाइनमध्ये 87, तर गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 12 हजार 810 व्यक्ती आहेत. जिल्ह्यात 1 हजार 332 व्यक्ती नव्याने दाखल झाल्याने दोन मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची संख्या एक लाख दोन हजार 383 एवढी झाली आहे.

आडवली-घाडीवाडीमध्ये कंटेन्मेंट झोन
मालवण तालुक्‍यातील आडवली-घाडीवाडीमध्ये नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने 300 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. झोनमध्ये 29 जूनपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे. हे आदेश अत्यावश्‍यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, बॅंक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या