"वर्षभरापासून महाराष्‍ट्र सरकार पाडण्याचे कारनामे सुरू"

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

भाजपचे काही मध्यस्थ महाराष्‍ट्रातील सरकार पाडण्याचा कट आखत आहेत, यातील काही मंडळींनी माझी भेट देखील घेतली. मागील वर्षभरापासून त्यांचे हे कारनामे सुरू आहेत,

मुंबई:  भाजपचे काही मध्यस्थ महाराष्‍ट्रातील सरकार पाडण्याचा कट आखत आहेत, यातील काही मंडळींनी माझी भेट देखील घेतली. मागील वर्षभरापासून त्यांचे हे कारनामे सुरू आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर केली.

बायकांच्या पदराआड लपून खेळी करणे थांबवा. मला तोंड उघडायला लावू नका! भाजपाच्या नेत्यांची संपत्ती सोळाशेपटीने कशी वाढली, याचा हिशोब माझ्याकडे आहे. मी जर ठरवले तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखे परदेशात पळून जावे लागेल, असेही ते म्हणाले.

माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे. ते सगळे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर येऊ शकतात, असा इशारा राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने नोटीस पाठविल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आल्यानंतर त्यास उत्तर देण्यासाठी शिवसेना भवनात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले की, माझ्या मनात ‘ईडी’बद्दल आदरच आहे. भाजपचे काही मध्यस्थ आहेत. मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितले आहे. सरकार पाडण्यासाठी काहीजण सातत्याने प्रयत्न करत आहेत. भाजपाची माकडं अकारण कालपासून उड्या मारत आहेत. 

संबंधित बातम्या