बाराशे मजुरांना घेऊन पहिली पाटणा ट्रेन रवाना

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

बिहारच्या कामगारांची विविध कागदपत्रे तपासून त्यांची जाण्यासाठी निवड करण्याचे निर्देश संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता व तपासणी करण्यात आली

ठाणे

 ठाणे रेल्वेस्थानकातून गुरुवारी पहिली विशेष ट्रेन बाराशे मजुरांना घेऊन सायंकाळी 4.30 च्या सुमारास बिहारमधील पाटणा गावाकडे रवाना झाली. प्रवाशांना टाळ्यांच्या कडकडाटात जिल्हा प्रशासनाने निरोप दिला. सर्व परप्रांतीयांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार परराज्यातील अडकलेल्या मजुरांना घरी पाठविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर त्यांच्या टीमने गुरुवारी सकाळपासून पाटणा ट्रेनचे नियोजन सुरू केले. गुरुवारी ठाणे रेल्वेस्थानकातून बिहार पाटणा येथे विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आली. बिहारच्या कामगारांची विविध कागदपत्रे तपासून त्यांची जाण्यासाठी निवड करण्याचे निर्देश संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता व तपासणी करण्यात आली. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. ठाणे प्रांत अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार अधिक पाटील आदींसह पोलिस उपायुक्तही स्थानकात उपस्थित होते.

नियमांची काटेकोर अंमलबजावणी
जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून प्रवासासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेडब्यातही प्रवाशांना सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली होती. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करून घेण्यात येत होती.

संबंधित बातम्या