लॉकडाऊनमध्ये आरे परिसरात वृक्षतोड?

Dainik Gomantak
बुधवार, 17 जून 2020

सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल

मुंबई

लॉकडाऊन असतानाही आरे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि आग लागण्याच्या घटना घडत आहेत, असा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. याबाबत खुलासा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मेट्रो प्रकल्पासाठी गोरेगाव येथील आरे परिसरात कारशेडचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाला तूर्तास अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतरही तेथे झाडे तोडण्यात येत असल्याचा आरोप वनशक्ती संस्थेने याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी न्या. अरुण मिश्रा आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.
लॉकडाऊनमध्ये जंगलातील झाडे कापण्यात येत असून, पोलिस तक्रारी करण्यात आल्या आहेत. जंगलात आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत; परंतु आगीशी संबंधित तक्रारी पोलिस नोंदवून घेत नाहीत. त्या तक्रारी राज्य राखीव पोलिस दलाच्या अखत्यारित येतात, असे याचिकादारांच्या वकील ऍड्‌. अनिता शेणॉय यांनी सांगितले. या घटनांबाबत गंभीर कारवाई करण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले. आरे वन प्राधिकरणाने वृक्षतोडीविरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल सहा आठवड्यांत दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
आरे वसाहतीत मेट्रो कारशेड उभारण्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यानंतर वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली होती.
 

संबंधित बातम्या