हळदीचे दूध, आल्याचा चहा आणि धुरी

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

तुरुंगांमधील कैद्यांसाठी कोरोना प्रतिबंधक उपाय

मुंबई

राज्यभरातील तुरुंगांमधील कैद्यांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कैद्यांना हळदीचे दूध, आले-लिंबाचा चहा, "क' जीवनसत्त्व आणि होमिओपॅथी गोळ्या दिल्या जातात. त्यांच्याकडून योगासने करून घेतली जातात; तसेच गाईच्या शेणाची धुरी देऊन वातावरण जंतुविरहीत करण्यात येते, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांवर तुरुंग विभागाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. राज्यभरातील तुरुंगांत केल्या जात असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपायांची माहिती सरकारने दिली आहे. येरवडा तुरुंगात निर्जंतुकीकरणाठी कडुनिंब आणि शेणाची धुरी दिली जाते. स्नानासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यात कडुनिंबाचा पाला टाकला जातो. मागील महिन्यात योग केंद्राकडून होमिओपॅथी गोळ्या पुरवण्यात आल्या होत्या.
ठाणे पोलिस आयुक्तांनी आयुष मंत्रालयाकडून मागवलेल्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप तुरुंगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कैद्यांनाही करण्यात आले. सर्व तुरुंगांतील कॅंटीनमध्ये हळदीचे दूध, संत्री, मोसंबी, लिंबू अशी फळे, आले-लिंबाचा चहा आदी पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, साबणाचे वाटप करण्यात आले आहे. या वस्तू सामाजिक संस्थांकडून ना नफा तत्त्वावर मिळतात. काही ठिकाणी कैदीही मास्क बनवत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सर्वतोपरी काळजी
तुरुंगांमधील 50 वर्षांवरील कैद्यांना स्वतंत्र काम दिले जात असून, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला असे गटही तयार केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगमुळे कैदी कोणाला भेटू शकत नसले, तरी व्हिडीओ कॉलद्वारे ते कुटुंबीयांशी संपर्क साधू शकतात. मानसिक स्वास्थ्य ठीक राहावे म्हणून त्यांचे समुपदेशनही केले जाते. कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

संबंधित बातम्या