टस्कर झाला आक्रमक

Dainik Gomantak
शनिवार, 13 जून 2020

हल्ल्याचा प्रयत्न; मोर्ले, केर, भेकुर्लीत धुमाकूळ

साटेली भेडशी

मोर्ले, केर, भेकुर्ली असा प्रवास करुन पुन्हा मोर्लेत आलेल्या टस्कराने काल (ता.11) दोन वेळा गावकऱ्यांचा पाठलाग केला. एकदा त्याने शेतात लागवडीसाठी काजू कलमे घेऊन जाणाऱ्या दोघा शेतकऱ्यांचा तर दुसऱ्या वेळेला ग्रामदेवतेच्या मंदिरात बसलेल्या युवकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो थेट मंदिराच्या पायरीपर्यंत पोचला होता. नंतर आपसूकच वळून तो मिरवेल पारगड दरम्यानच्या जंगल भागाकडे गेला.
गेले दोन आठवडे त्या टस्कराचा वावर मोर्ले, केर, भेकुर्ली दरम्यान आहे. तो एकटाच सगळीकडे फिरतो आहे. केर भेकुर्लीतून दोन दिवसांपूर्वी त्याने आपला मोर्चा मोर्लेत वळवला. मोर्लेतील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील जंगल परिसरात काजू लागवड करण्यासाठी जाणाऱ्या सुभद्रा अर्जुन रेडकर आणि बाळकृष्ण धुमासकर यांच्या अंगावर तो धावून आला. अंगावर धावून येण्याआधी तो मोठ्याने ओरडतो. त्याच्या चित्काराने सगळ्या परिसरावर त्याची दहशत पसरते. श्रीमती रेडकर आणि श्री. धुमासकर यांचीही त्याच्या भीतीने गाळण उडाली. श्रीमती रेडकर तर थरथर कापत होत्या. त्यांना संतोष मोर्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांनी धीर दिला. त्यांच्या घराच्या पूर्वेला त्या हत्तीचा वावर होता.
त्यानंतर तो हत्ती उत्तर दिशेकडे गेला. त्या परिसरात मंदिर आहे. मंदिराच्या समोरून नियोजित मोर्ले पारगड रस्ता जातो. उत्तरेकडील जंगल भागात तो होता तर मंदिरात अनेक युवक बसले होते. त्याला पिटाळण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली; पण तो पळण्याऐवजी मोठ्याने ओरडून त्या युवकांच्या अंगावर चाल करून आला. काही क्षणात त्याने थेट मंदिरासमोरील पत्र्याच्या शेडमधून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचला. त्याला घाबरून पळालेल्या युवकामधील एकाने ए थांब, देवापुढे येऊ नको असे म्हटले आणि काय आश्‍चर्य मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेला टस्कर निमूटपणे वळला आणि आल्या मार्गाने परत गेला. त्याला पळून पळणाऱ्या युवकांनी त्याही स्थितीत त्याचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. दिवसा आणि रात्री त्याचा वावर वस्तीजवळ सुरूच आहे. रात्रीच्या वेळी फणसाच्या झाडावरील फणस सोंडेने काढून खाणे हा जणू त्याचा नित्यक्रम बनला आहे.

वनविभाग हत्तीला रोखण्यात अपयशी
दुसरीकडे वनविभाग त्याला वस्तीकडे येण्यापासून रोखण्यात अपयशी ठरला आहे. गावकऱ्यांच्या मते वनाधिकारी हत्तीच्या बंदोबस्ताबाबत विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. दरम्यान, प्रभारी वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे आज दुपारी मोर्लेत जाणार होते. तेथील गावकऱ्यांशी ते संवाद साधणार होते. त्या चर्चेबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

 

 

संबंधित बातम्या