महाराष्ट्रातील मद्यपी पर्यटकाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

काल सकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्रातील मद्यावस्थेत असलेल्या पर्यटकाने कसिनो कार्यालयाजवळ असलेला नो पार्किंगचा फलक ओढून काढला

पणजी: पणजीतील कसिनो कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गजबजलेल्या ठिकाणी एका पर्यटकाला झालेल्या मारहाणप्रकरणी पणजी पोलिसांनी विनोद राय (पर्वरी) व फयाझ दोड्डामणी (चिंबल) या दोघांना अटक केली असून तिसऱ्याचा शोध घेत आहेत. मारहाणीत जखमी झालेला पर्यटकाच्या शोधार्थ पणजी पोलिस महाराष्ट्रात गेले आहेत. 

काल सकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्रातील मद्यावस्थेत असलेल्या पर्यटकाने कसिनो कार्यालयाजवळ असलेला नो पार्किंगचा फलक ओढून काढला व त्याने रस्त्याच्या मधोमध तो फलक हातात धरत वाहतूक अडविली. त्यामुळे तेथे वाहनांच्या रांगा लागल्या. त्याने तेथे असलेल्या एका गरीब युवकाच्या थोबाडीत मारली त्यामुळे तेथे असलेले लोक त्याच्या या गैरवर्तणुकीमुळे संतप्त बनले व त्यातील तिघांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला. पळताना तो रस्त्यावर पडल्यावर त्याल या तिघा संशयितांनी लाथाबुक्क्यांने मारहाण केली. 

हा सर्व प्रकार एका तरुणाने मोबाईलमध्ये कैद केला व तो सोशल मिडियावर व्हायरल केला होता. या घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तिघा अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मद्यावस्थेत असलेल्या पर्यटकानेही एका युवकाच्या थोबाडीत मारले तसेच वाहतूक अडविली हे कसिनो कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरातून घेतलेल्या माहितीमुळे उघड झाले. त्यामुळे त्या पर्यटकाविरुद्धही पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याचा शोध घेत आहे.

संबंधित बातम्या