सर्जेकोटमध्ये दोन नौका बुडाल्या

अवित बगळे
रविवार, 19 जुलै 2020

एक जण बेपत्ता; बचावलेल्यांपैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ
 

मालवण

सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारीस गेलेली बोट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन समुद्राच्या मुखाजवळ बुडाली. बोटीतील चार मच्छीमार पाण्यात फेकले गेले. त्यांना वाचवण्यास गेलेली दुसरी बोटही लाटांच्या तडाख्यात बुडाली. दोन्ही बोटींवरील आठ ते दहा मच्छीमारांनी तासभर पोहत किनारा गाठला; मात्र एकजण समुद्रात बेपत्ता झाला. त्याचवेळी अत्यावस्थ झालेल्या दोघा मच्छीमारांना ग्रामीण रुग्णालयात आणले. दिवाकर जानू देऊलकर (वय 26, रा. सर्जेकोट मालवण) बेपत्ता आहेत. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली.
सर्जेकोट येथील यशवंत देऊलकर "मोरया' नौका घेऊन सकाळी सहाच्या सुमारास परेश फोंडबा, रमेश देऊलकर, केशव फोंडबा, दिवाकर देऊलकर यांच्यासह सर्जेकोट खाडीत मासेमारीस गेले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर पात पाण्याने खेचली गेली व उलटली. चारही जण खाडीच्या पाण्यात फेकले गेले. त्यांना वाचविण्यासाठी मच्छीमारांनी आरडाओरडा सुरू केला. लगेचच राजेश देऊलकर यांची कार्तिक ही पात घेऊन काही मच्छीमार मदतीसाठी धावले; मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाचविण्यासाठी गेलेली पातही उलटली. सर्व जण पाण्यात फेकले गेले. पोहत जाऊन काहींनी किनारा गाठला. बुडालेल्या बोटीवरील चारपैकी तीन जण व वाचविण्यास गेलेल्या कार्तिक बोटीवरील राजेश देऊलकर, रजनीकांत देऊलकर, प्रसाद आडकर, नूतन पेडणेकर, किशोर कांदळगावकर, यशवंत देऊलकर, प्रशांत जामसंडेकर यांनी किनारा गाठला. बचाव कार्यासाठी काही मच्छीमार ग्रामस्थ सहभागी झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजय पाटणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्याच्या सूचना केल्या. ग्रामपंचायत व ग्रामस्थही मदतकार्यात सहभागी होते.

दोघे अत्यवस्थ
खाडीपात्रात बुडलेल्यांपैकी केशव फोंडबा व त्यांना वाचवण्यास गेलेल्यांपैकी यशवंत देऊलकर यांची तब्येत पाण्याच्या बाहेर आल्यावर गंभीर बनली. त्यांना तातडीने मालवण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस प्रशासनानेही घटनेची माहिती घेत जबाब नोंद केला आहे.

बेपत्ता मच्छीमाऱ्याच्या शोधासाठी मोहीम
खाडीपात्रात बुडालेल्या मोरया बोटीवरील दिवाकर जानू देऊलकर तरुण खाडी व समुद्रात बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू होते.

 

संबंधित बातम्या