यकृतदानामुळे दोन लहान मुलांना जीवदान

Dainik Gomantak
मंगळवार, 9 जून 2020

आईनेच दिले यकृत; ग्लोबल रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
 

मुंबई

यकृताचा कर्करोग असणाऱ्या दोन चिमुरड्यांवर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात परळ येथील ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्‍टरांना यश आले आहे. जन्मतः यकृताचा म्हणजेच "हेपाटोब्लास्टोमा' (बालपणातील एक अत्यंत दुर्मिळ यकृत कर्करोग) या दुर्मिळ आजारामुळे या मुलांचे यकृत निकामी झाले होते, पण या दोघांच्या आईने पुढाकार घेत यकृत दान करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर या लॉकडाऊनमध्येही ही अवघड शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे दोघांना नव्याने जीवदान मिळाले आहे.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या एका लहानशा गावात राहणारा आराध्य सरोदे (6) आणि हिंगोलीमध्ये राहणारी मयुरी ढेंबरे (9) या दोघांना यकृताचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. जन्मतः या दोघांनाही यकृताची समस्या होती; परंतु योग्य निदान होऊ न शकल्याने आजार वाढल्याने दोघांनाही कर्करोगाची लागण झाली होती.
वैद्यकीय भाषेत याला हेपाटोब्लास्टोमा (बालपणातील एक अत्यंत दुर्मिळ यकृत कर्करोग) असे म्हणतात. या आजारामुळे दोन्ही मुलांचे यकृत निकामी झाले होते. या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. मात्र, दोघांसाठी त्यांची आई पुढे आली. या दोन्ही मुलांच्या आईने यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. लॉकडाऊनच्या आधीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नंतर त्या शस्त्रक्रियाही रखडल्या. अशा स्थितीत दोन्ही मुलांचा जीव वाचवणे गरजेचे असल्याने डॉक्‍टरांनी यकृत प्रत्यारोपणाचे आव्हान स्वीकारले.
ग्लोबल रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवी मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्‍टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली.
मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवी मोहंका म्हणाले की, ""शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या दोन्ही मुलांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. हा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. दोन्ही मुलांच्या आईने यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु मयुरीच्या आईचा (आशा ढेंबरे) रक्तगट जुळत नसल्याने त्यांना एक विशिष्ट इंजेक्‍शन देण्यात आले होते. त्यानंतर 1 मे रोजी मयुरीवर यकृत प्रत्यारोपण पार पडले. याशिवाय 20 मे रोजी आराध्यच्या आईने यकृताचा भाग दान केल्यावर त्याच्यावर ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.''

गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया
लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण करणारे सर्जन डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले, ""लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हे अवघड आणि गुतांगुतीचे काम आहे; परंतु डॉक्‍टरांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर 24 तास डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते; परंतु आता दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.''

संबंधित बातम्या