मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

एकूण 650 जण बाधित; राज्यात 14 कर्मचाऱ्यांनी गमावला जीव 

मुंबई

मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात एक पार्कसाईट पोलिस ठाण्यातील हवालदार व दुसरे वाहतूक पोलिस विभागात सहायक फौजदार म्हणून कार्यरत होते.
पार्कसाईट पोलिस ठाण्यात कार्यरत 57 वर्षीय पोलिस हवालदाराचा अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते विक्रोळीतील टागोरनगर येथे वास्तव्याला होते. त्यांना ताप आल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते.  याशिवाय सहार वाहतूक विभागात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत पोलिसाचाही मृत्यू झाला.
सध्या राज्यात एकूण 1328 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तब्बल 650 पोलिस कर्मचारी हे मुंबई पोलिस दलातील आहेत. राज्यात आतापर्यंत 14 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कौतुकाची बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेले 191 पोलिस कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत रुजूही झाले आहेत. त्यात एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.
 
नागरिकांच्या बेजबाबदारपणाचे बळी 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मुंबईतून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या रक्षणासाठी मुंबई पोलिस दिवस, रात्र रस्त्यांवर गस्त घालत आहे. मात्र लॉकडाऊनबाबत लोक आजही गंभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, मास्कचा वापर न करणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. यादरम्यान नागरिकांशी थेट संबंध येत असल्याने त्याची किंमत पोलिसांना चुकवावी लागत आहे.

संबंधित बातम्या