अहो आश्‍चर्यम्! हवेवर धावणार दुचाकी

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

अमरावतीच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पेटंट

कसबा: आतापर्यंत आपण बाइक्‍स केवळ पेट्रोल, डिझेलवर चालताना पाहिली आहे. पण लवकरच रस्त्यांवर हवेवर चालणारी दुचाकी पाहिली; तर आश्‍चर्य वाटायला नको. या दुचाकीमध्ये पेट्रोल, इथेनॉल, सौरऊर्जेसह पवनऊर्जेचा पर्याय राहणार आहे. गरजेनुसार कुठलाही पर्याय असल्याने ही दुचाकी हवेवरसुद्धा धावणार आहे. नुकतेच अमरावतीमधील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील पेटंट रजिस्टर केलेले आहे.

सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. या दोन्हींवर उपाय काढत पारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करून सिपनाच्या विद्यार्थ्यांनी हायब्रीड इंजिनचा वापर करीत इथेनॉल, सौरऊर्जा व पवनऊर्जेचा वापर करीत अनोखे संशोधन केलेले आहेत. या बाइक्‍सच्या मागील व पुढील चाकात इलेक्‍ट्रिक हब मोटरचा वापर होणार आहे. उंच व कठीण वाटेवर गाडीची क्षमता वाढावी म्हणून दोन्ही हबचा एकत्रित उपयोग मोलाचा ठरणार आहे.     शिवाय गाडीचे ब्रेक दाबल्यावर कायनेटिक एनर्जीचे रूपांतर इलेक्‍ट्रिक एनर्जीमध्ये होणार आहे. या गाडीमध्ये ड्युअल बॅटरीचा वापर करण्यात येणार आहे. मागील भागावर सौरपॅनल व पुढील भागात पवनऊर्जेचा वापर होणार आहे. या दोन्ही माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा लिथियम बॅटरीमध्ये स्टोअर होईल. एकप्रकारे ही बाइक्‍स केवळ हवेवर चालणार आहे. 

संबंधित बातम्या