‘कोरोनाची लस आलेली नाही,भान ठेवून वागा’ ; उद्धव ठाकरेंचे नागरिकांना आवाहन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही लस आलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी भान ठेवून वागावे,’’ असे आवाहन महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सण संयमाने साजरे केले तरी, आता नागरिक गर्दी करत असल्याने नाराज असल्याचे त्यांनी जनतेशी संवाद साधताना नमूद केले.

मुंबई :  ‘‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही लस आलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी भान ठेवून वागावे,’’ असे आवाहन महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सण संयमाने साजरे केले तरी, आता नागरिक गर्दी करत असल्याने नाराज असल्याचे त्यांनी जनतेशी संवाद साधताना नमूद केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. काही लोक मास्क न वापरता, कोणतीही काळजी न घेता फिरत असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आता कोरोनाची लाट नाही, त्सुनामी येईल. आरोग्य सुविधा कमी पडतील. त्यामुळे विषाची परीक्षा का घेता आहात?’’ 

संयम बाळगण्याचे आवाहन हे कायदा करण्यापेक्षा मला महत्त्वाचे वाटते असे नमूद करून ते म्हणाले, ‘‘जगात कोरोना रुग्ण वाढत आहेत. अद्याप लस आलेली नाही. ती आली तरी प्रत्येकाला देईपर्यंत प्रचंड वेळ लागेल. त्यामुळे काळजी घ्या. काही लोक रात्री संचारबंदी लागू करा, अशा सूचना देत आहेत. अहमदाबादला रात्री संचारबंदी लागू केली आहे. आपल्याला हे टाळायचे असेल तर काळजी घ्या. फटाके  वाजवू नका असे आवाहन केले होते. ते लोकांनी ऐकले. कायद्याचा बडगा न उगारता काही कामे करावीत अशा मताचा मी आहे.’’

‘‘शाळा सुरु करण्याचा विचार तर सुरु आहे. पण, त्यातील धोका लक्षात घेतला तर कदाचित काही पावले उचलावी लागतील,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘काही लोक सगळे उघडा अशी मागणी करतात. पण ते जबाबदारी थोडीच घेणार आहेत? माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे काळजी घेऊन योग्य वाटेल तेच सुरू केले जाईल.’’
‘‘महाराष्ट्राचा आरोग्याचा नकाशा तयार करायचा आहे. राज्याचे आरोग्य आपल्याला या काळात कळले. त्यामुळे त्याबद्दल विचारपूर्वक पावले उचलली जातील,’’असेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

संबंधित बातम्या