आचार, विचार आणि शरीराला शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न खंचनाळे आण्णांनी केला. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन कोल्हापूर नगरीला त्यांनी स्वतःला अर्पण केले. इथली तांबडी मातीच माझे जगणं सार्थकी लावणारं मूळ आहे, असं ते म्हणत. घरची चांगली शेतीवाडी, आर्थिक सुबत्ता असलेले आण्णा गावाकडे मौजमजेत रानावनात भटकायचे. मित्राच्या समवेत नदीला पोहणे इतकाच कार्यक्रम ठरलेला. वडील यल्लाप्पा यांची मात्र श्रीपती आण्णांना मोठ्ठा पैलवान करण्याची इच्छा. एके दिवशी अचानक वडिलांनी त्यांना शाळेतून काढलं आणि थेट तालमीत सरावासाठी पाठवले. थोड्या कालावधीत चांगली चमक दाखवल्यानंतर कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत ते दाखल झाले. १७ व्या वर्षी त्यांनी कोल्हापूरची माती अंगाला लावली. सुप्रसिद्ध मल्ल विष्णू नागराळेंच्या निगराणीखाली आण्णा घडत होते. त्याचबरोबर मल्लाप्पा तडाखेंचं मार्गदर्शन त्यांना लाभत होते. त्या काळातल्या या तगड्या मल्लांच्या कुस्तीकलेचा प्रभाव आण्णांवर पडला. कर्नाटकातल्या अकोळच्या मैदानात रंगा पाटील या तगड्या, अनुभवी मल्लाला खंचनाळे आण्णांनी चितपट केले आणि सगळीकडे त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला.
चपळाईने समोरच्या मल्लावर कब्जा मजबूत करण्याची खासियत होती. आक्रमक खेळीने समोरच्या मल्लाला ते बेहाल करत. एकेरी पट काढणे, घुटना ठेवणे, एकलंगी भरणे, समोरून आकडी लावणे असे अनेक डाव त्यांच्या भात्यात होते. समोरच्या मल्लाशी दोन हात केले की, काही मिनिटे त्याच्या खेळीचा अंदाज घ्यायचा आणि त्याला अनुसरूनच डाव मारायचा, ही कला आण्णांना चांगलीच जमली होती. दरवेळी वेगळाच डाव मारून प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवण्यात ते माहीर झाले. अनेक स्पर्धांसाठी त्यांना निमंत्रणे येत होती. महाराष्ट्रासहीत उत्तर भारतातल्या मेरेरुद्दीन, खडसिंग, बट्टासिंग, किशनलाल, सची रामसारख्या एकापेक्षा एक सरस मल्लांसमवेत त्यांच्या लढती झाल्या. कोल्हापूरच्या खासबाग मैदानात पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबीशी झालेली लढत गाजली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या लढतीत अखेरीस बरोबरी झाली.
१९५९ ला ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘हिंदकेसरी’ या मानाच्या किताबावर त्यांनी आपले नाव कोरले. भारताचे पहिले हिंदकेसरी ठरल्याने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी शाबासकी देत ‘महाराष्ट्र का नाम रोशन किया, अब देश का नाम रोशन करो’ अशा शुभेच्छाही त्यावेळी दिल्या.
खंचनाळे यांच्याविषयी थोडक्यात
पूर्ण नाव- श्रीपती यल्लापा खंचनाळे
वय- ८६
मूळ गाव - एकसंबा (ता. चिक्कोडी) जि. बेळगांव
प्राथमिक शिक्षण - एकसंबा गावातच
कुस्तीचे प्राथमिक धडे - एकसंबा गावातच
कुस्तीची जडणघडण
- १८ वर्षांचे असताना कोल्हापुरांतील शाहूपुरीतील तालमीत दाखल, वस्ताद - हसनबापू तांबोळी, मल्लापा तडाखे,
- जुन्या काळातील प्रसिद्ध मल्ल विष्णू नागराळे यांचेही मार्गदर्शन
- कुस्ती करताना पहाटे ३ वाजल्यापासून सराव चालू
- व्यायाम - रोज तीन हजार बैठका, तीन हजार जोर
- आहार - एक लिटर थंडाई, एक किलो तूप - दोन किलो मटन व सूप
- वजन - १४० किलो
- कुस्तीची वैशिष्टे - अत्यंत चपळता व आक्रमकता, प्रतिस्पर्ध्याला अंदाज येण्याआधीच डावांची रचना
- प्रचंड ताकदीमुळे घुटना डावावर हुकमत पट काढण्यात माहीर
खंचनाळे यांची कुस्तीची कारकीर्द
१९५९ - पहिले महाराष्ट्र केसरी
३ मे १९५९ - देशात पहिल्यांदा हिंदकेसरीचा बहुमान
१९६२ - दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक
१९६३ - जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड - रशिया दौरा - मॅटवरच्या कुस्तीत अपयश
१९६४ - दिल्लीतील खलीपा बद्रींच्या आखाड्यात आठ वर्षे सराव
उत्तर भारतात अनेक कुस्ती मैदाने गाजविली, दिल्ली, द्वारका. बडोदा येथील कुस्ती लक्षणीय ठरल्या.
पाकिस्तानात तीन महिने वास्तव्य - बरीच मैदाने गाजविली. तिथून अरबस्तान, इराण, इराक दौरा, त्याच बरोबर जर्मनी, फ्रान्स मध्येही कुस्ती मैदानात सहभाग
या काळात चांगली बिदागी मिळाली - ७०-८० हजारांची कमाई
२०० हून अधिक कुस्त्या खेळणारा पैलवान
चांदीच्या सात गदा, तीन सुवर्णपदकांची कमाई
महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, एकलव्य, द्रौणाचार्य, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान
४५ व्या वर्षी कुस्तीतून निवृत्ती.
कुस्ती प्रशिक्षक व पंच म्हणून कामगिरी बजावली.
पाच जण महाराष्ट्र केसरी
एक जण हिंदकेसरी
कुस्तीगीर परिषदेचा पदाधिकारी म्हणून राज्य पातळीवर काम पाहिले.
कुस्ती क्षेत्रासाठी सुमारे ५० वर्षे योगदान दिले
उत्तर भारतात तब्बल आठ वर्षे डंका असणारा पैलवान
कुस्तीच्या सरावासाठी दिल्लीला खलीपा बद्रींच्या आखाड्यात ते दाखल झाले. तब्बल आठ वर्षे त्यांनी तिकडे सराव केला. या काळात उत्तर भारतातील अनेक प्रदेशांत त्यांनी कुस्त्या जिंकल्या. द्वारका, बडोदाच्या प्रसिद्ध कुस्ती दंगलीत ते चमकले. उत्तर भारतात ते लाडके मल्ल बनले. अनेक इनाम मिळवले. पहाटे तीनला उठून रोज तीन हजार बैठका, तीन हजार जोर असा त्यांचा व्यायाम अन् खुराकात एक लिटर थंडाई, एक किलो तूप, दोन किलो मटण, फळे असा भरपूर आहार ते घेत.
आणि.. विना पासपोर्टचेच पोहचले पाकिस्तानात
पाकिस्तानातील लाहोर, मुलतान येथे त्यावेळी कुस्तीच्या स्पर्धा भरत. दिल्लीतील एका सहकाऱ्याने त्यांना पाकिस्तानाला जायची योजना सांगितली. पासपोर्ट तर नाही, तो कसा काढायचा हेही माहीत नसल्याने बिगर पासपोर्टचे ते पाकिस्तानात दाखल झाले. तब्बल तीन महिने तिथे वास्तव्य करत अनेक मैदानातील लढती जिंकल्या व तेथील लोकांची मने जिंकली. तिथून अरबस्तान, इराक, इराण अशा देशांचा दौरा करत त्यांनी तेथील कुस्तीची परंपरा पाहिली. रशिया, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशांतही ते गेले आणि पाच महिन्यांनी दिल्लीला परतले होते.