विक्रोळीतील कलाकाराची नृत्य करत भाजी विक्री

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

रोशन शिंगे यांचे व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल

नीलेश मोरे

घाटकोपर

लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद राहिल्याने कलाकारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही कलाकार छोटे-छोटे उद्योग करत आहेत. रोशन शिंगे हा कलाकारही सध्या भाजी विक्री करत आहे. मात्र हे काम करताना तो नाचत नाचत कोरोनाबाबत जनजागृतीही करत असून त्याचे व्हिडीओही समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत.
रोशन पुण्यातल्या चंदन नगरमध्ये भाजी विकून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहे. रोशन हा मुळचा विक्रोळीतील टागोरनगर येथील रहिवासी आहे. तो पुण्यात एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गेला होता. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने तो पुण्यातच अडकला. सध्या तो पुण्यात आपल्या बहिणीकडे राहत आहे. यावेळी काही तरी काम केले पाहिजे म्हणून त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
भाजी विकतानाही त्याच्यातला कलाकार काही शांत बसला नाही. भाजी विकताना त्याने आपल्या कलाकारीचा चांगलाच उपयोग केला आहे. लॉकडाऊनमध्ये त्याच्या करियरला मोठा फटका तर बसला आहे, तरी सुद्धा तो खचला नाही. भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू करून तो संकटात ठामपणे उभा राहून आपल्या कालाकारीची जाणीव करून देत आहे.

कलाकारीमुळे व्यवसायात फायदा
रोशन हा रात्रीच्या वेळेस भाजी मार्केटमध्ये भाजी विकत घ्यायला जात असून सकाळी 5 वाजल्यापासून तो भाजी विकायला सुरुवात करतो. आपला संपूर्ण दिवस भाजी विकण्यात घालवत आहे. कलाकारी सादर करत भाजी विक्रीच्या व्यवसायात चांगलाच फायदा होत असल्याचे रोशनने सांगितले.

संबंधित बातम्या