संतप्त पत्नीने केली पतीची "नाकाबंदी'

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

प्रेयसीसोबत कारमध्ये पाहिल्यावर भररस्त्यात घातला गोंधळ

मुंबई

मुंबईकरांना वाहतूक कोंडी नवी राहिलेली नाही; मात्र पेडर रोडवरील एका रस्त्यावर वाहनांच्या लागलेल्या रांगा आणि एका महिलेचा कारच्या बॉनेटवर चढून चाललेला गोंधळ अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. आपला पती प्रेयसीसोबत कारमधून जात असल्याचे पाहून पत्नीचा पारा चढला आणि तिने दुसऱ्या गाडीने कारचा पाठलाग करून भररस्त्यात त्याला आपला इंगा दाखवून दिला. पती-पत्नीच्या भांडणाने वाहतूक विस्कळित झाल्याने पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला.
गावदेवी परिसरात पेडर रोडवर तिशीतला एक तरुण काळ्या रंगाच्या आलिशान कारमध्ये शनिवारी एका महिलेसह चालला होता. त्या कारच्या मागून पांढऱ्या रंगाच्या गाडीतून एक महिला आली, तिने ओव्हरटेक करून काळ्या रंगाची कार अडवली. कारमधील तरुण तिचा पती होता. स्वतःच्या कारमधून उतरताच तिने पतीला बाहेर येण्यास सांगितले. तो येत नसल्याने संतापून ती कारच्या बोनेटवर जाऊन बसली. आपली सॅण्डल काढून ती समोरच्या काचेवर ठोसे मारू लागली. सर्व गोंधळात एका लेनवर वाहतुकीची पुरती कोंडी झाली. घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिसांनी तिला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. ती आपल्या पतीचा पिच्छा सोडत नव्हती. शेवटी तिचा पती कारमधून उतरला. तो उतरताच तिने त्याला लाथ मारली. दोघांमध्ये काही तरी बोलणे झाले आणि दोघेही तिच्या कारमध्ये जाऊन बसले. पती सोबत आल्यानंतरही महिलेचा राग शांत झाला नाही. ती गाडीतून उतरून पुन्हा काळ्या रंगाच्या कारजवळ धावत गेली आणि आतील महिलेशी बाचाबाची करू लागली. त्याबाबतचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अखेर प्रकरण गावदेवी पोलिस ठाण्यात गेले, परंतु दोघांनीही तक्रार करायची नाही, असे सांगितल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

पोलिसांनी दिली समज
सार्वजनिक ठिकाणी कार सोडून वाहतुकीची कोंडी केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी संबंधित महिलेला ई-चलान पाठवले आहे. दोघांनी तक्रार केलेली नसल्याने पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले.
 

संबंधित बातम्या