बीएडची डिग्री हवी साठ हजार द्या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

सोशल मीडियावरील संदेशामुळे विद्यापीठात गोंधळ

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाची बीएड व एमएडची डिग्री हवी असेल तर 60 हजार रुपये द्या. तुम्हाला डिग्री मिळेल. यासाठी या संपर्क क्रमांकावर दूरध्वनी करा, असा संदेश काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये फिरत होता. काही जणांनी आज त्याची माहिती परीक्षा विभागाला दिली. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित क्रमांकावर संपर्क करून खात्री केली.
पदवी विकत असल्याचा संदेश पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटले. गेल्या काही दिवसांपासून हा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. आज ते पाहून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. यामध्ये काही तथ्य आहे का हे पाहण्यासाठी संबंधितांनी त्या क्रमांकावर दूरध्वनी केला. त्यावेळी समोरून एका पुरुषाने फोन घेतला. "पदवी देतो, पण 60 हजार रुपये लागतील. पदवी खोटी असून भविष्यात याबाबत कोणीही आक्षेप घेतला तर आम्ही जबाबदार नाही,' असेही त्याने सांगितले. त्याचे उत्तर ऐकून परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना या संदेशाची खात्री पटली. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन विचार करत आहे.

माझे कनेक्‍शन दिल्लीपर्यंत
पदवीबाबत खोदून विचारल्यावर त्या व्यक्तीने आपण नांदेडमध्ये राहतो तसेच माझे दिल्लीपर्यंत कनेक्‍शन आहे, असे सांगितले. हे आणखीच गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांना जाणवले.

शिवाजी विद्यापीठाची कोणतीही पदवी कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून दिली जात नाही. विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यापीठ पदवी देते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेवू नये.
प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, प्रभारी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या