अभिनेत्रीच्या दाव्याने केली लोकांची दिशाभूल..! जल शुद्धीकरण यंत्राची जाहिरात मागे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

बऱ्याच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जाणाऱ्या संबंधित जाहिरातीत आमच्या वॉटर प्युरिफायरमुळे कोरोनाचे विषाणू नष्ट होतात, असा दावा एक ज्येष्ठ अभिनेत्री करीत होती. त्या जाहिरातीविरुद्ध ग्राहक पंचायतीच्या कॉन्सिलवरील प्रतिनिधी डॉ. अर्चना सबनीस यांनी आक्षेप घेतला होता.

मुंबई- कोरोनाचे विषाणू नष्ट करायचे असतील तर 'हे' उपकरण वापरा, अशी एका जलशुद्धीकरण यंत्राच्या कंपनीची जाहिरात मुंबई ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्यामुळे मागे घेतली गेली आहे. या जलशुद्धीकरण यंत्राची जाहिरात एक प्रसिद्ध अभिनेत्री करत होती. ज्यात तिने हा दावा केला होता. आता तिच्यावरही कारवाई केली जाईल की नाही हे बघावे लागणार आहे.       

ग्राहक पंचायतीने आक्षेप घेतल्यावर 30 ऑक्‍टोबरपासून संबंधित जाहिरातीमधील तो दावा मागे घेत असल्याचे कंपनीने ऍडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडियाला कळवले आहे. कौन्सिलने तशी माहिती कळवल्याचे पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले. विविध प्रसारमाध्यमांवर चुकीचे दावे करणाऱ्या जाहिरातींवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार कौन्सिलतर्फे लक्ष ठेवून कारवाई केली जाते. 

बऱ्याच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जाणाऱ्या संबंधित जाहिरातीत आमच्या वॉटर प्युरिफायरमुळे कोरोनाचे विषाणू नष्ट होतात, असा दावा एक ज्येष्ठ अभिनेत्री करीत होती. त्या जाहिरातीविरुद्ध ग्राहक पंचायतीच्या कॉन्सिलवरील प्रतिनिधी डॉ. अर्चना सबनीस यांनी आक्षेप घेतला होता. जाहिरातीमधील दावा सिद्ध करण्याची नोटीस कौन्सिलने कंपनीवर बजावली. त्यावर कंपनीने दावा सिद्ध करण्याऐवजी जाहिरातीतील दावाच मागे घेत असल्याचे म्हणणे मांडले. यापुढे असा दावा करणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे त्यांचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. संबंधित अभिनेत्रीला पुढील एक वर्ष कोणत्याही वस्तूची किंवा सेवेची जाहिरात करण्यावर बंदी घालावी, अशी मागणीही ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. प्राधिकरणाने यासंदर्भात दोघांनाही नोटीस बजावल्याचे पंचायतीच्या पत्रकात म्हटले आहे. 

कारवाईचे "शोले' अभिनेत्रीवर बरसणार का? 

नव्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडेसुद्धा ग्राहक पंचायतीने यापूर्वीच संबंधित जाहिरातीबाबत तक्रार केली आहे. जुन्या जमान्यातील एका ज्येष्ठ अभिनेत्रीने जाहिरातीत वरील दावा केला होता. त्यामुळे नव्या ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 18 नुसार संबंधित कंपनी व ज्येष्ठ अभिनेत्री अशा दोघांवरही पुढील कारवाई व्हावी, अशी पंचायतीची मागणी आहे. कलमानुसार दोघांनाही प्रत्येकी दहा लाख रुपये दंड होऊ शकतो. 

संबंधित बातम्या