कष्टाने पिकविलेल्या टरबुजाला एक रुपया भाव

Dainik Gomantak
सोमवार, 11 मे 2020

शेतातून व्यापाऱ्याने चक्क प्रतिनग एक रुपया एवढ्या कवडीमोल भावाने टरबुजांची खरेदी केली. त्यांनी मुलाबाळांसह टरबुजांची तोडणी केली. बाराशे टरबूज निघाले. त्यामुळे त्यांच्या हाती जेमतेम बाराशे रुपये पडले.

हिंगोली

कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर वादळी वारे, गारपीट अशा संकटांना सतत तोड देत असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास यंदा कोरोनाच्या संकटाने हिरावून घेतला. तालुक्‍यातील वरूड गवळी येथील शेतकरी शांताराम मोरे यांनी बारा हजार रुपये खर्च करून टरबूज लागवड केली होती. लॉकडाउनमुळे टरबूज विक्रीस अडचणींचा सामाना करावा लागला. शेवटी त्यांनी एक रुपयाला एक याप्रमाणे बाराशे टरबुजांची बाराशे रुपयांत व्यापाऱ्याकडे विक्री करावी लागली.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सर्वांसाठीच डोकेदुखी ठरला आहे. जिल्हा प्रशासन दररोज विविध आदेश काढत असल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत. शांताराम मोरे यांच्याकडे पाण्याची व्यवस्‍था असल्याने त्‍यांनी यंदा दीड हेक्टरमध्ये भाजीपाला व टरबुजाची लागवड केली. माल विक्रीसाठी तयार झाला आणि कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन सुरू झाले. याचा फटका त्यांच्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना बसला.
लॉकडाउनमुळे श्री. मोरे यांना भाजीपाल्याची विक्री करता आली नाही. परिणामी तो पूर्णपणे सडला. आता टरबूज तोडणीस आले; मात्र त्‍याच्या विक्रीसाठी येत असलेल्या अडचणींमुळे त्यांनी व्यापाऱ्याला विक्री करण्याचा निर्णय घेतला. श्री. मोरे यांच्या शेतातून व्यापाऱ्याने चक्क प्रतिनग एक रुपया एवढ्या कवडीमोल भावाने टरबुजांची खरेदी केली. त्यांनी मुलाबाळांसह टरबुजांची तोडणी केली. बाराशे टरबूज निघाले. त्यामुळे त्यांच्या हाती जेमतेम बाराशे रुपये पडले. त्यांना मिळालेल्या उत्पन्नातून तोडणीचाही खर्च निघाला नाही.

भाजीपाला व टरबुजाची दीड हेक्‍टरमध्ये लागवड केली. जवळपास दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्यामुळे भाजीपाला जागीच सडून गेला. त्‍यानंतर टरबूज तोडणीस आले; मात्र बाजारात जाण्यासाठी अडचणी येत आहेत. व्यापारीदेखील खरेदी करण्यास तयार होईनात. एका व्यापाऱ्याला एक रुपयाला नग याप्रमाणे बाराशे टरबुजांची विक्री केली. लागवडीसाठी बारा हजारांचा खर्च आला होता.
- शांताराम मोरे, शेतकरी

संबंधित बातम्या