यापुढे लॉकडाउनचे नाव काढू नका........

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

यापुढे लॉकडाउनचे नाव काढू नका, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले. 

पंढरपूर : गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाउन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले. आता कोरोनाबरोबरच आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी सामाजिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर आवश्‍यक आहे. यापुढे लॉकडाउनचे नाव काढू नका, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले. 

कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सपत्निक महापूजा पार पडली. महापूजेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, आठ - नऊ महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फार बिकट झाली आहे. दररोज काम केले तरच त्यांचा प्रपंच आणि घरदार चालते. त्यामुळे सततच्या लॉकडाउनचा फटका सर्वसामान्य आणि गरीब लोकांना बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या-ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा हा आदेश सर्वांनी पाळला आहे. 

तुम्ही आषाढीची पूजा कधी करणार? असे विचारले असता, पवार यांनी, आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते, असे सांगत, पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे, असे उत्तर त्यांनी दिले. वारकरी संप्रदाय समंजस असून काही मंडळींनी वेगळी भूमिका घेतली होती, तरीही त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांनी पाठिंबा दिला नाही. कोरोनामुळे केंद्र व राज्यात कर जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल, असा इशाराही अजित पवारांनी या वेळी दिला.

संबंधित बातम्या