निषेध व्यक्त करणारच; मध्यवर्ती म. ए. समितीचा निर्धार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

काळ्यादिनी काढण्यात येणाऱ्या फेरीसह इतर कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत कर्नाटक प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतली आहे. मात्र, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचे मूलभूत हक्‍क डावलू नका, असे सांगत काळ्यादिनी निषेध व्यक्‍त करण्यासाठी प्रशासनाकडे तीन पर्याय दिले आहेत.

बेळगाव : काळ्यादिनी काढण्यात येणाऱ्या फेरीसह इतर कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत कर्नाटक प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतली आहे. मात्र, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचे मूलभूत हक्‍क डावलू नका, असे सांगत काळ्यादिनी निषेध व्यक्‍त करण्यासाठी प्रशासनाकडे तीन पर्याय दिले आहेत. तसेच सर्व प्रकारचे नियम पाळून काळ्यादिनी निषेध व्यक्‍त करणारच, असे ठणकावून सांगण्यात आले आहे.

काळ्या दिनाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी २८ रोजी सहायक पोलिस आयुक्‍तांच्या कार्यालयात मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांत चर्चा झाली. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी लोकशाहीच्या मार्गाने लढा सुरू असून कोरोनाचे नियम पाळून एक नोव्हेंबर रोजी मराठी भाषिक निषेध नोंदविणार आहेत. एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी कोरोनामुळे गर्दी होऊ नये, यासाठी कार्यक्रमांना परवानगी नाकारली. त्यामुळे, १ नोव्हेंबर रोजी कशा प्रकारे कार्यक्रम करणार, याची माहिती देण्याची सूचना केली. सर्वांची मते जाणून घेऊन काळ्यादिनी कशाप्रकारे निषेध नोंदवावा, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

उद्या अंतिम निर्णय
मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे काळ्यादिनी निषेध नोंदविला जाणार आहे. हे स्पष्ट झाले आहे. यावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. तरीसुद्धा शुक्रवारी (ता. ३०) काळ्यादिनाच्या कार्यक्रमाबाबत अंतिम निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या