सिंधुदुर्गात रक्ताचे नाते आटते तेव्हा...

Dainik Gomantak
बुधवार, 10 जून 2020

कोरोनाच्या दहशतीने नातेवाइकांसह गावानेही मृतदेह नाकारला; पोलिसांनी पुढाकार घेत केले अंत्यसंस्कार

ओरोस

हिंदू संस्कृतीत रक्ताचे नाते, माणुसकी याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्यभर वैर असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यावरही त्याच्या अंत्यविधीला जुने सर्व विसरून सहभागी होण्याची रित; मात्र कोरोनामुळे येथे रक्ताचे नातेही आटले. माणुसकीही गहीवरेल, असा प्रकार जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाबाबत झाला. मृत्यूनंतर अग्नी देणे सोडाच, तिच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घ्यायलाही नकार दिला.
जिल्ह्यात कोरोनाने नुकत्याच एका महिलेचे निधन झाले. तिला अन्य आजार होते. त्याचबरोबर कोरोनाची लागण झाली होती; मात्र मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तिचा पती, मुलगा व सून असे नातेवाईक उपस्थित होते; मात्र त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही. ती ज्या गावची महिला होती, तेथील ग्रामस्थांनी मृतदेह गावात आणायचा नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे माणुसकीही गहिवरली.
एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचे निधन झाल्यास पुढील 12 तासांत त्यावर अंत्यविधी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नातेवाईक व शेजारी ग्रामस्थांनी अंत्यविधीला नकार दिल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने हा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी रानबांबुळी ग्रामपंचायतची परवानगी घेत सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या स्मशानभूमीत त्या महिलेचा अंत्यविधी केला.

"ती' नातेवाईकांचीच जबाबदारी
या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर म्हणाले, ""हा माणुसकी विसरण्याचा प्रकार आहे. तिच्या नातेवाइकांना विनंती करूनही त्यांनी अंत्यविधिला नकार दिला. तिच्या गावकडील ग्रामस्थांनी मृतदेह गावात घेण्यास नकार दिला. 12 तासात अंत्यविधी करणे बंधनकारक असल्याने आम्ही शासकीय पातळीवर अंत्यसंस्कार केले; मात्र ही जबावदारी प्रशासनाची नाही. नातेवाइकांची आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकाला गावात पाठवू नका, अशीही मागणी नागरिक करीत आहेत, हे चुकीचे आहे.''

संबंधित बातम्या