'एक नव्हे 10 महिलांशी संबंध ठेवेन'; पत्नीला धमकावून तीन तलाक देणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवणाऱ्या पतीविरोधात एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे. पतीबरोबरच सासू सासऱ्यांविरोधातही तिने ट्रीपल तलाक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

बुलडाणा- कायदा केल्यानंतरही देशात ट्रीपल तलाकच्या घटना सर्रास घडताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवणाऱ्या पतीविरोधात एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे. पतीबरोबरच सासू सासऱ्यांविरोधातही तिने ट्रीपल तलाक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

काय आहे प्रकरण? 

बुलडाण्यातील चिखली शहरात राहणाऱ्या मोहसीनचा दीड वर्षांपूर्वी शेगाव येथील तरूणी बरोबर विवाह झाला होता. याच दरम्यान मोहसीनचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध सुरू होते. पत्नीला याबाबत समजल्यावर तिने त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. 
 
 आरोपी मोहसीनला समजावून सांगितल्यावरही त्याने त्या महिलेशी संबंध ठेवले. यानंतर मात्र, पीडितेने आपल्या माहेरी सर्व घटना सांगितल्यावर त्याने तिला प्रचंड मारहाण केली. पतीच्या त्रासाला कंटाळून महिला आपल्या माहेरी येऊन राहायला लागली. यानंतर 22 नोव्हेंबरला पीडितेच्या घरी येत आरोपीने भांडण काढत एक नव्हे तर 10 महिलांशी संबंध ठेवू असे सांगितले. त्याचवेळी त्याने तिला ट्रीपल तलाक दिला आणि तेथून पळ काढला.

पीडितेने दाखल केला गुन्हा- 

प्रकरण गंभीर होत गेल्यावर पीडितेने पोलिसांत तक्रार केली. तसेच याप्रकरणी त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या आईवडिलांविरोधातही तिने तक्रार दाखल केली.  
 

संबंधित बातम्या