चेहऱ्याजवळ हात जाताच अलर्ट मिळणार

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनवला हॅण्ड सॅनिटायझर बॅंड

मुंबई

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी घड्याळाहून थोडे मोठ्या आकाराचे हॅन्ड सॅनिटायझर बॅंड बनवले आहे. त्यामुळे चेहऱ्याजवळ हात जाताच अलर्ट मिळणार आहे. अलर्ट मिळताच हातावर सॅनिटायझर स्प्रे होतो. त्यामुळे नकळत होणाऱ्या कोरोना संसर्गापासून बचाव होणार असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा बॅंड विकसित केला आहे. कोरोनाचा संसर्ग तोंड, नाक, डोळे यांमार्फत होत असल्याने मास्क घालणे आणि हात सॅनिटाईझ करणे, असे उपाय सरकार सुचवित आहे. चेहऱ्यास वारंवार हात लावल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक लोकांना होत असल्याचे लक्षात येताच मुंबई विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ते रोखण्यासाठी यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी साहित्य उपलब्ध करून दिले. या साहित्याचा वापर करत या विद्यार्थ्यांनी महिनाभरात हे यंत्र तयार केले आहे.

असे आहे यंत्र
हॅन्ड सॅनिटायझर बॅंडचे दोन भाग आहेत. एक सॅनिटायझर बॉक्‍स आणि दुसरे कंट्रोलर. हे यंत्र एक मनगटीपट्ट्यासारखे हातात घालायचे. त्यानंतर व्यक्तीने चेहऱ्यावर हात लावायचा प्रयत्न केल्यास कंट्रोलर लगेच सॅनिटायझर बॉक्‍सला याबाबत माहिती देते. मग हे यंत्र आपोआप मनगटी भागाजवळ सॅनिटायझर स्प्रे करेल. त्यामुळे चेहऱ्याला हात लावण्यापूर्वीच हात सॅनिटाइझ होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्‍य होणार असल्याचा दावा भौतिकशास्त्र विभागाचा विद्यार्थी जतिन काडगे यांनी केला आहे.

चार हजार रुपयांचा खर्च
हे यंत्र बनविण्याची युक्ती वनस्पतीशास्त्र विभागाची विद्यार्थिनी सुस्मिता गुदुळकर हिला सुचली. तिने ही युक्ती जतिन काडगेला सांगितल्यानंतर हे यंत्र बनविण्याची तयारी सुरू झाली. या यंत्राचे सॉफ्टवेअरचे काम आशीष पाठक याने केले; तर नितीन काडगे यांनी हे यंत्र विकसित केले. हे यंत्र बनविण्यासाठी चार हजार रुपये खर्च आला असून कंपन्यांची मदत मिळाल्यास हे यंत्र आणखी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देता येऊ शकते, असे जतिनने सांगितले. हे यंत्र प्राथमिक असून यामध्ये आणखी बदल करावे लागतील, असेही त्याने सांगितले.

संबंधित बातम्या