कसाबला फाशीपर्यंत पोहचवणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू 

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

रुग्णालयात सुरू होते उपचार; हरिश्‍चंद्र श्रीवर्धनकर यांची झुंज अपयशी

कल्याण

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आतंकवादी बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार करत असताना कामा हॉस्पिटलबाहेर असलेल्या हरिश्‍चंद्र श्रीवर्धनकर या वृद्धानेही आतंकवाद्यांच्या गोळ्या अंगावर झेलल्या होत्या. अजमल कसाब याची ओळख पटवणाऱ्या प्रमुख साक्षीदारांपैकी ते एक होते. श्रीवर्धनकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. हरिश्‍चंद्र हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. 
अलीकडेच हरिश्‍चंद्र हे मुंबईतील चिंचपोकळी परिसरात दिसले होते. त्यानंतर त्यांना कल्याणमधील त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केल्यानंतर केडीएमसीचे नगरसेवक दया गायकवाड यांनी एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कल्याणमध्ये येऊन हरिश्‍चंद्र यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. अजमल कसाबला फासावर लटकवणाऱ्या मुख्य साक्षीदारांपैकी ते एक होते. त्यांचे देशप्रेम आणि निडरपणा कायम नागरिकांच्या स्मृतीत राहील, अशा शब्दांत केडीएमसीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शोक व्यक्त केला. 

पदपथावर राहण्याची वेळ
कुटुंबीयांनी घराबाहेर काढल्यामुळे श्रीवर्धनकर यांच्यावर पदपथावर राहण्याची वेळ आली होती. चिंचपोकळी परिसरातील डीन डिसुजा दुकानदाराने त्यांना आश्रय दिला. त्यानंतर त्यांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हरिश्‍चंद्र यांना मदत केली आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांशी भेट घडवून दिली.

दोन गोळ्या लागूनही केला होता प्रतिकार
मुंबईतील 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल याने हरिश्‍चंद्र यांच्या पाठीत दोन गोळ्या झाडल्या होत्या. मात्र हार न मानता हरिश्‍चंद्र श्रीवर्धनकर यांनी बॅगच्या साह्याने इस्माईलला मारत प्रतिकार केला. कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार म्हणून हरिश्‍चंद्र हे कायम सर्वांच्या स्मृतीत राहतील. विशेष न्यायालयासमोर कसाबला त्यांनी ओळखत त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती.

संबंधित बातम्या