ऐतिहासिक राजपथावर होणार ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे' चे दर्शन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचा असणार सहभाग

नवी दिल्ली: येत्या २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या  संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे दृष्य आपल्याला बघायला मिळणार आहे. . या पथसंचलनासाठी रंगीत तालमी सुरू झाली असून चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती धरली आहे.

राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्रासोबतच इतर निवड झालेल्या राज्य व केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. येथील कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्यपूर्ण काम पूर्णत्वास येत आहे. आणि या चित्ररथावरील प्रतिकृती रथाचे खास आकर्षण ठरत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ही चित्ररथ तयार करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर राज्याच्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडणार आहे.

हे कलाकार साकारतील चित्ररथ

राज्याच्या चित्ररथ बांधणीचे कार्य नागपूर येथील शुभ संघाचे प्रमुख राहुल धनसरे   यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.  हा चित्ररथ रोशन गुले (24)  आणि तुषार प्रधान (23) या  तरूण कलाकारांनी तयार केलेला आहे. हा आकर्षक चित्ररथ  कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  30 कलाकार तयार करत आहेत. 

असा असणार आहे चित्ररथ

चित्ररथाच्या सुरवातीला वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती असणार आहे. या मूर्तीपुढे ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या  मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी  8.5 फूट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. या सर्व पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंगकाम सुरु आहे.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत. या प्रतिकृती बनविण्याचे काम सुरु असून  त्यांच्या बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे टीम शुभ चे राहुल धनसरे यांनी सांगितले.

आणखी वाचा:

कर्नाटकची एक इंच जमीनही महाराष्ट्राला देणार नाही -

संबंधित बातम्या