पैशांसाठी धाकट्या बहिणीला विकले

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

व्यापाऱ्याचे पीडितेवर अत्याचार; थोरल्या बहिणीला अटक

मुंबई

दोन लाख रुपयांसाठी थोरल्या बहिणीनेच अल्पवयीन बहिणीचा विवाह 49 वर्षीय व्यापाऱ्याशी ठरवला. त्यानंतर मुलीला पाहण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याने पीडितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्दमध्ये घडला आहे. वेळीच ही बाब आईला समजल्याने हा विवाह रोखण्यात आला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पीडित मुलीची मोठी बहीण, तिचा पती आणि व्यापाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे.
मानखुर्द परिसरात पीडित 16 वर्षीय पीडिता तिची 25 वर्षीय मोठी बहीण आणि भावजींसोबत रहाते. काही दिवसांपूर्वीच मोठ्या बहिणीची भेट या परिसरात भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 49 वर्षीय व्यक्तीशी झाली. त्यावेळी त्याने आपण लग्नासाठी एका लहान मुलीच्या शोधात असल्याचे सांगितले. यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना आपण 2 लाख रुपयेही देऊ, असे त्याने सांगितले. त्यामुळे निर्माण झालेल्या पैशांच्या लालसेतून मोठी बहीण व तिच्या पतीने अल्पवयीन पीडित मुलीचा व्यवहार तिच्या आणि तिच्या आईच्या नकळत ठरवला. आईला याबाबत माहिती मिळताच तिने मानखुर्द पोलिसांत तिची मोठी मुलगी, जावई आणि अत्याचार करणाऱ्या भाजीविक्रेत्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून तिघांना अटक केली आहे.

माहिती कशीबशी आईपर्यंत पोहोचवली
आरोपी व्यापाऱ्याने मुलीला पाहण्याच्या नावाखाली मोठ्या बहिणीला तिला घेऊन येण्यास सांगितले होते. 2 ऑगस्ट रोजी पीडित मुलीला आरोपी बहिणीने व्यापाऱ्याने बोलावलेल्या ठिकाणी नेले. त्यावेळी मुलीशी एकांतात गप्पा मारण्याच्या नावाखाली व्यापारी पीडितेला एका खोलीत घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केले. वेदनेने असह्य झालेल्या पीडित मुलीने ही माहिती कशीबशी आईपर्यंत पोहचवल्यानंतर ही घटना समोर आली.ॉ

संपादन- अवित बगळे
 

संबंधित बातम्या