मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील युसूफ मेमनचा हृदयविकाराने मृत्यु

Dainik Gomantak
शनिवार, 27 जून 2020

युसूफ मेमन हा 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. या खटल्यातील प्रमुख गुन्हेगारांना कटकारस्थान करण्यासाठी युसूफने फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. सप्टेंबर 2007 मध्ये विशेष टाडा न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

नाशिक

1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार व कुख्यात दहशतवादी टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन याचा शुक्रवारी (ता. 26) हृदयविकाराने मृत्यु झाला. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
युसूफ अब्दुल रज्जाक मेमन (वय 55) हा सकाळी साडेनऊच्या सुमारास ब्रश करीत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला कारागृहातील रुग्णालयात व नंतर साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. मृत्यु संदर्भातील अधिकृत माहिती शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. याबाबत सरकारवाडा पोलिसात नोंद करण्यात आली असून, मृतदेह धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
युसूफ मेमन हा 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. या खटल्यातील प्रमुख गुन्हेगारांना कटकारस्थान करण्यासाठी युसूफने फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. सप्टेंबर 2007 मध्ये विशेष टाडा न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. युसूफ व त्याचा भाऊ इसाक मेमन या दोघांना 2018मध्ये मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. तेव्हापासून दोघेही कारागृहातील अंडा सेलमध्ये होते.

संपूर्ण कुटूंबच उध्वस्त
12 मार्च 1993ला मुंबई शहर 13 बॉम्बस्फोटांनी हादरले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिम यांनी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांत अडीचशेपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यु, तर दीड हजार नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर हे तिघेही भारतातून पसार झाले असून, अद्याप फरारी आहेत. तर, टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमन यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात 30 जुलै 2015ला फाशी देण्यात आली. दरम्यान, मेमन बंधूंचे आई-वडिलही या प्रकरणात आरोपी होते. त्यामुळे हे कुटूंबिय भारतात परतताच युसूफ मेमनचे वडिल अब्दुल रझाक मेमन शिक्षा भोगत असताना तुरूंगात आजारी पडले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र, 2001मध्ये वयाच्या 73 व्या वर्षी त्याचे निदन झाले. ते उत्साही क्रिकेटपटू व मुंबई लिगमधील खेळाडू होते. तर आई हनिफा मेमन आणि आणखी एक भाऊ सुलेमान मेमन या दोघांना टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले आहे. सलमानची पत्नी रुबिना हिला मात्र जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मेमन बंधुंनी साखळी स्फोटासाठी लागणारे आरडीएक्‍स ज्या गाडीतून आणले, ती गाडी रूबिना हिच्या नावावर असल्याने तिला दोषी ठरविण्यात आले.

माहिममधल्या इमारतीत रचला कट
या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार टायगर मेमन असून, तो आई-वडिलांसह माहीम येथील आठ मजली अल-हसैनी नामक इमारतीत राहत होता. त्याच्या घरातच शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. याच इमारतीत बॉम्बस्फोटांचे कट रचण्यात आले. बॉम्बस्फोटांच्या आदल्या दिवशी टायगरच्या माणसांनी तेथे आरडीएक्‍स आणून ठेवले होते.

टायगर मोस्ट वॉंटेड गुन्हेगार..
याकूबचा भाऊ मुश्‍ताक उर्फ टायगर हा तस्करीच्या आरोपांमुळे भारतासाठी मोस्ट वॉंटेड गुन्हेगार होता. स्फोटांच्या एक दिवस आधी तो दुबईमध्ये पळून गेला आणि तेथूनच पाकिस्तानात गेला. बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा बदला घेण्यासाठी त्याने दाऊदसोबत बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड प्लॅन केला असल्याचे बोलले जाते. या प्रकरणात सामील असलेल्या आरोपींना शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी तिकीटही त्याने दिले. त्यानंतर 1994 मध्ये टायगरला अटक करून टाडा कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. 2006 मध्ये त्याला दोषी ठरवले आणि 27 जुलै 2007 ला कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. 21 मार्च 2013ला सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

दाऊदच्या मृत्यूबाबत आशंकाच
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या याआधी अनेकदा आल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरली. त्यानंतर अनेक आजार असलेल्या दाऊदचा कोरोनामुळेच कराचीमधील एका रुग्णालयात मृत्यू झाल्याचेही वृत्त देण्यात आले. काही वृत्तवाहिन्यांनी ही बातमी सूत्रांचा हवाला देत वारंवार प्रसारित केली. मात्र, दाऊदचे व्यवहार सांभाळणारा त्याचा भाऊ अनिस याने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या