मल्लिकार्जुन देवस्थानात शुक्रवारी महाशिवरात्री

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

श्री मल्लिकार्जुन देवस्थानात महाशिवरात्री दिवशी या अंबारी रथातून मिरवणूक काढली जाते.

शेकडो वर्षांपासून श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त अभिषेकाकरता गोवा व कर्नाटक राज्यातील विविध भागातील भाविक गर्दी करतात. यंदा हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी सुरू होईल.

आगोंद : महाशिवरात्रीनिमित्त श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानात शुक्रवार २१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत अभिषेक व २३ रोजी समुद्रस्नासाठी श्रींची पालखी राजबाग-तारीर या ठिकाणी देवावेळ येथे पोहचेल, अशी माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे.
महाअभिषेक दुपारी झाल्यानंतर महाआरती, त्‍यानंतर महाप्रसादाचे वितरण होईल. रात्री ८.३० वा. श्रींची अंबारी रथातून मिरवणूक काढली जाईल. नंतर श्रींचे देवस्थानात आगमन झाल्यानंतर पूजा, तीर्थप्रसाद वितरण होईल.

रविवार २३ रोजी पहाटे ५.३० वा. श्रींची पालखी व लवाजमा देवावेळ या समुद्र किनाऱ्यावर सकाळी ७ वा. पोहचेल. या निमित्ताने पारंपरिक ठिकाणी आरती स्वीकारून किंदळे येथे निराकार देवस्थानात पारंपरिक रीतिरिवाज संपल्यानंतर श्रींची पालखी पुढे जाते. ज्या भागातून पालखी जाते त्या भागात साफसफाई व तोरणे उभारून स्वागत केले जाते.

देवावेळ या ठिकाणी जत्रा भरते. विविध प्रकारची दुकाने यानिमित्ताने थाटली जातात. दहा दिवसानंतर काणकोण भागात पारंपरिक शिमगोत्सवाला सुरवात होते. शिमग्यासाठी विशिष्ट प्रकारची मुंडासा, रंगीत तोणया, विविध प्रकारच्या माळा खरेदी करण्यासाठी दक्षिण गोव्यातील नागरिक याठिकाणी गर्दी करतात.
जत्रोत्सवात भाविकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. या दिवशी भाविक समुद्राला केळी अर्पण करून भेट घेतात. नवीन वधू-वर समुद्रस्नान करून दानधर्म करतात. या एका दिवशी लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होते.

देवावेळ या ठिकाणी श्रींची पालखी पोहचणे हा या भागातील भाविकांकरता आनंदाचा क्षण असतो. वर्षातून एकदाच येणाऱ्या या क्षणांचे साक्षिदार होण्याकरिता भाविक मोठी गर्दी करतात.

शहरी भागाचा दर्जा देण्याची महसूल खात्याची घोषणा

संबंधित बातम्या

फोटो फीचर