१०८ शिवलिंग दर्शन सोहळा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

समस्यांना आपणच जन्म देतो : डॉ. सचिन परब

कांपाल येथे बांदोडकर मैदानावर प्रजापिता ब्रह्माकुमारीतर्फे आयोजित महाशिवरात्री महोत्सवात मार्गदर्शन करताना डॉ. सचिन परब.

नैराश्‍यावस्थेत मोठे निर्माण कशा प्रकारे घेतले जातात. याकडे लक्ष वेधून डॉ. सचिन परब यांनी सांगितले की, समोरचा माणूस आपल्याला काहीही बोलो, भले जनावर म्हणो, म्हणून आपण काही जनावर थोडेच होणार. मुड खाली येणे, ही नैसर्गिक बाब आहे. त्यासाठी मन मोकळं करायला हवं. जीवनाकडे आपण कसे बघतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

पणजी : दुसऱ्याला बदलण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्वतःलाच बदलणे हा आहे. स्वतःच्या विचारामुळे आपण आपला मूड घालवून बसतो, हे आपल्याला कळत नाही आणि नैराश्‍य स्वतःच ओढावून घेत असतो. गेलेल्या गोष्टींचे पुन्हापुन्हा स्मरण करून आपणच आपल्यासाठी समस्या निर्माण करतो. आपल्या वाईट विचारांना, समस्यांना आपणच जन्म देत असतो. याची जाणीव ख्यातनाम समुपदेश डॉ. सचिन परब (क्लिनिकल रिसर्च, मुंबई) यांनी येथे दिली.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयातर्फे कांपाल, पणजी येथे दयानंद बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ८४ वा महाशिवरात्र महोत्सव व १०८ व्या शिवलिंग दर्शन सोहळ्यात सिक्रेट ऑफ अल्टिमेट लिव्हिंग या विषयावर मार्गदर्शन करतान डॉ. सचिन परब यांनी नैराश्‍याची कारणे, त्यावर उपाय यासंबंधी खेळीमेळीच्या वातावरणात व रोचक शैलीत उहापोह केला. समूपदेशन करताना आलेले अनेक अनुभव व किस्से सांगून त्यांनी विवेचन उपस्थितांना खिळवून ठेवले.

जीवनात ९५ टक्के गोष्टी चांगल्या झाल्या तरी शंभराव्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रीत करून नैराश्‍य पदरी पाडून घेतो. दुसऱ्याचं, आपल्या घरातल्यांचं कौतुक करण्यामुळे बराच फरक पडत असतो.
नकारात्मक विचार, अहंगड, छोटे छोटे गैरसमज यामुळे नात्यांमध्ये कसा संघर्ष निर्माण होतो, प्रसंगी आत्महत्या, नवराबायकोमध्ये ताणतणावामुळे घटस्फोटापर्यंत टोकाचा निर्णय आदींविषयी घडलेल्या घटनाच उदाहरण समोर ठेवून डॉ. परब यांनी आपल्या विवेचनातून मुद्दे अधिक स्पष्टपणे मांडले. आमदार निळकंठ हळर्णकर यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार सागर जावडेकर हे सन्माननीय पाहुणे होते. व्यासपिठावर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय, गोवा विभागाच्या शोभा बेहन तसेच कुसूम बेहन, सुरेखा बेहन, संध्या बेहन, गीता बेहन, परदेशातून आलेल्या सन्ना बेहन व्यासपिठावर उपस्थित होत्या.

हळर्णक व जावडेकर यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारीचे कार्य मौलिक असल्याचे सांगितले. जावडेकर म्हणाले, आज साऱ्या जगात अशांतता आहे. युवा पिढी तणावाखाली आहे. जगातील अशांतता दूर करण्याची क्षमता भारतीय तत्वज्ञानात आहे. प्रत्येकाने स्वतःचा आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. सकारात्मक विचारांच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मंत्री, आमदार ऐनवेळी या महोत्सवात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पणजीचे महापौर उदय मडकईकर यांच्याहस्ते या महोत्सवातील राजयोग ध्यानधारणावरील विविध स्टॉलचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यात व्यसनमुक्ती, योगीक शेती, पौष्टीक आहार विषयक माहिती दिली जात आहे. ता. २६ पर्यंत या महोत्सवात मान्यवर वक्ते सत्र घेणार आहेत. शिवाय १०८ शिवलिंगाचे दर्शनही लोकांना घेता येणार आहे.
नागराज अंकलेकर यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित बातम्या

फोटो फीचर