मलेरियावरील औषध कर्करोगावर वापरणे शक्य

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजीः ‘गोवा बिट्स पिलानी’मधील साहाय्यक प्राध्यापक अंशुमन सरकार यांनी मलेरियावर वापरले जाणारे औषध फुफ्फुसाच्या कर्करोगावर यशस्वीरीत्या वापरले जाऊ शकते हे सिद्ध केले आहे. अंशुमन सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयबीएबी, बेंगळुरू यांच्या सहयोगाने गोवा बिट्स पिलानी येथे याविषयीचे शोध कार्य हाती घेऊन ते पूर्ण केले आहे.

पणजीः ‘गोवा बिट्स पिलानी’मधील साहाय्यक प्राध्यापक अंशुमन सरकार यांनी मलेरियावर वापरले जाणारे औषध फुफ्फुसाच्या कर्करोगावर यशस्वीरीत्या वापरले जाऊ शकते हे सिद्ध केले आहे. अंशुमन सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयबीएबी, बेंगळुरू यांच्या सहयोगाने गोवा बिट्स पिलानी येथे याविषयीचे शोध कार्य हाती घेऊन ते पूर्ण केले आहे.

या कामासाठी चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून त्यांना अनुदान मिळाले होते. अंशुमन सरकार हे सध्या संस्थेच्या जैविक विज्ञान विभागात काम करत असून त्यांनी क्लेव्हलँड क्लिनिकच्या कर्करोग जीवशास्त्र विभागात पोस्ट-डॉक्टरेटचे प्रशिक्षण घेतले आहे.

गोव्यात कर्करोगाच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे, की गेल्या २ वर्षांत एक लाख लोकसंख्येमागे जवळजवळ ४५ लोकांना कर्करोग होतो. सध्याचे वातावरण आणि धूम्रपान फुफ्फुसांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे (जीएटीएस) इंडियाच्या २०१६-२०१७ च्या अहवालानुसार ४.२ टक्के गोमंतकीय धूम्रपान करतात, तर राज्यातील ५.५ टक्के लोक तंबाखू खातात. पुरुषांसाठी फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वात जीवघेणा कर्करोग असल्याचे आढळून आले आहे.

राष्ट्रीय स्तरावर ७.५ टक्के कर्करोगाचे रुग्ण सापडतात, तर वर्षाकाठी होणाऱ्या मृत्यूमध्ये दहा टक्के मृत्यू फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे होतो. दरवर्षी दोन दशलक्ष भारतीयांमध्ये हा आजार उद्भवतो. ‘द लान्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या वहिल्या राज्यस्तरीय रोग- बोज अभ्यासाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर असे दिसून आले आहे, की गोवा देशातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असूनही या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये निदान झालेल्या ‘नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर’ (एनएससीएलसी) औषधांचा प्रतिकार करत असल्यामुळे उपचार करणे फारच कठीण होते असे आढळले आहे. यावर पुनरुत्पादित औषध क्विनाक्रिन (क्यूसी) वर आधारित आहे, जे मलेरियावर एक गुणकारी औषध आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगावरील क्विनाक्रिनची कर्करोगविरोधी क्षमता आढळून आल्याच्या काही घटना घडल्या आहेत. एकदा अंशुमन सरकारांच्या संशोधनावर आधारित औषध बाजारात उपलब्ध झाल्यावर लोकांना ते परवडेल अशा किमतीत मिळेल आणि त्याद्वारे रुग्णांचे आयुष्यही वाढेल.

नावीन्यपूर्ण उपचारांच्या एका प्रक्रियेसाठी अत्यंत खर्च झाल्यामुळे शास्त्रज्ञांनी कर्करोगाच्या आजारासाठी इतर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या आणि क्लिनिकल औषधांची पुनःर्प्राप्ती करण्यास सुरवात केली आहे.
- अंशुमन सरकार
 

संबंधित बातम्या