बार्देशमधील मंगळसूत्र चोरी प्रकरणांचा अखेर छडा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

अन्साभाट-म्हापसा येथील पौर्णिमा हॉटेलच्या परिसरातील रस्त्यावरून २८ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता चालत जाताना आपल्या गळ्यातील मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांपैकी एकाने हिसकावले.अशा आशयाची तक्रार अन्साभाट म्हापसा येथील दीपा द्वारकानाथ नावेलकर यांनी २१ जानेवारी २०२० रोजी म्हापसा पोलिस स्थानकात सादर केली होती.

म्हापसा: बार्देश तालुक्‍यात विविध ठिकाणी घडलेल्या मंगळसूत्र चोरी प्रकरणांचा अखेर छडा लागला आहे. रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर मूळ दिल्ली येथील व सध्या मांद्रे पेडणे येथे राहत असलेल्या संशयिताला ट्रान्सफर वॉरंटवर आणून त्याला अटक केली असता त्याच्याकडून म्हापशात घडलेल्या मंगळसूत्र चोरी प्रकरणातील ऐवज हस्तगत करण्यात आला.

सुमारे ३५ ग्रॅम वजनाच्या त्या मंगळसूत्राची किंमत सुमारे एक लाख चाळीस हजार होती, असेही त्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्या चोरी प्रकरणातील दुचाकीचालकाने डोक्‍यावर हेल्मेट परिधान केले होते. त्यासंदर्भात म्हापसा पोलिस स्थानकात भारतीय दंड संहितेच्या ३५६, ३७९ (संदर्भ कलम ३४) या कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या चोरी प्रकरणासंदर्भात म्हापसा पोलिसांना माहिती मिळाली की रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुकेश अशोक शर्मा (गोल्लू/ राकेश) या पस्तीस वर्षीय मूळच्या दिल्ली येथील (सध्या मांद्रेत वास्तव्य) इसमास गोव्यात विविध ठिकाणी घडलेल्या सुवर्णालंकार चोरी प्रकरणांत १० जानेवारी २०१९ रोजी अटक केली होती. त्या आरोपीला आज ट्रान्सफर वॉरंटवर म्हापशात आणून त्याला म्हापशातील मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक केली असता त्याच्याकडून म्हापशातील ते मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. या संशयिताला म्हापसा येथील न्यायालयासमोर उद्या शुक्रवारी रिमांडसाठी पेश केले जाणार आहे. गोव्यातील इतरही अनेक ठिकाणी झालेल्या सुवर्णालंकार चोरी प्रकरणांत या संशयिताचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.

कोलवाळ येथील सेंट रिटा हायस्कूलसमोरून २५ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.१०च्या सुमारास जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची तक्रार तानोडीवाडा, पीर्ण, बार्देश येथील रेशमा रमेश शेट्ये यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी म्हापसा पोलिस ठाण्यात सादर केली होती. ३६ ग्रॅम वजनाच्या त्या मंगळसूत्राची किंमत सुमारे एक लाख पन्नास हजार होती, असेही त्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

तसेच करासवाडा येथील आकई कपेलजवळून २ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्यावरून चालत जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी आपल्या गळ्यातील चाळीस ग्रॅम वजनाची व सुमारे एक लाख पन्नास हजार मोलाची सोनसाखळी गळ्यातून हिसकावून पलायन केले अशा आशयाची तक्रार सोनिया नामदेव कळंगूटकर (रा. वन खाते तपासनाक्‍याजवळ, करासवाडा, म्हापसा) या पन्नास वर्षीय महिलेने १५ जानेवारी २०२० रोजी म्हापसा पोलिस ठाण्यात केली होती. या प्रकरणातील दोघेही चोरटे अंदाजे पंचवीस वर्षे वयाचे असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
याही दोन्ही अन्य प्रकरणांतील वाहनचालकाने हेल्मेट परिधान केले होते. तसेच या दोन्ही प्रकरणांत भारतीय दंड संहितेच्या उपरनिर्दिष्ट कलमांखाली म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. वरील दोन्हीही गुन्ह्यांसंदर्भात या संशयिताला अटक होणार आहे.या दोन्ही दोन्ही प्रकरणांतील ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.या प्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक विभा वळवईकर व साहाय्यक उपनिरीक्षक सतीश नाईक अधिक तपास करीत आहेत.

पैरात चौगुले खाणीवरील ‘शॉवेल’ला सील

संबंधित बातम्या