आंब्याचे दर उतरले, मागणीही घटली

dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

पिंपळकट्टा - मडगाव येथे आंब्याचा घाऊक बाजार भरत असून बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आंब्याचे दर उतरलेले असले तरी आंब्याची मागणीही घटली आहे.

नावेली

पिंपळकट्टा - मडगाव येथे आंब्याचा घाऊक बाजार भरत असून बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आंब्याचे दर उतरलेले असले तरी आंब्याची मागणीही घटली आहे.
आंब्याचे घाऊक व्यापारी उदय आडपईकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या मानकुराद आंब्याचा दर प्रती शेकडा ९००० रु., ८००० रु., ५००० रु. व ४००० रु. असा आहे. हापूस आंबा प्रती शेकडा २ हजार ते ४ हजार रुपये, पायरी आंबा प्रती शेकडा २ ते अडिच हजार रु., सावेर आंबा प्रती शेकडा २ ते ४ हजार रु. दराने विकला जातो.
लोकांजवळ आंबे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने व लॉकडाऊन काळ असल्याने लोक घराबाहेर पडत नसल्याने बाजारात ग्राहक येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी काही लोक ऑनलाईन ऑर्डर करून खरेदी करतात, तर काहीजण आंबे विक्रेत्यांना फोन करून ऑर्डर करतात व आंबे विक्रेते घरपोच सेवा देतात, असे त्यांनी सांगितले.
सध्या मडगावात शिवोलीचा मानकुराद आंबा मोठ्या प्रमाणात येतो. कुंडईचा आंबा अद्याप बाजारात आला नाही. दिवाडीचा आंबा पणजी बाजारात, माशेलचा माशेल बाजारात, सासष्टीचा आंबा बाजारात आला नाही. जर या भागातून आंबे यायला सुरवात झाली, तर आणखी दर खाली येण्याची शक्यता आहे.

चौकट

कामगार नसल्याने गैरसोय
आंबे काढण्यासाठी गोव्यात कामगार मिळत नसल्याने सध्या आंबा बागायतदारांची मोठी गैरसोय झाली आहे. पूर्वी बिहार व उत्तर प्रदेश राज्यातून आंबे काढण्यासाठी कामगार आणले जात होते. या कामगारांना मार्च ते एप्रिल असे तीन महिने आंबे काढण्याचे काम मिळायचे व जून महिन्यात हे कामगार पुन्हा आपल्या गावी जात. यावर्षी बाहेरील राज्यातून कामगार आले नसल्याने स्थानिक कामगारांच्या सहाय्याने काही ठिकाणी आंबे काढण्यात आले. आंबे विक्रेत्यांची मुले शिकून नोकरीला लागल्याने ती मुले या व्यवसायात येत नाहीत. असे आडपईकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या