केंद्र सरकार करणार आयडीएसए चे नामांतरण

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

‘आयडीएएस’ला मनोहर पर्रीकरांचे नाव
केंद्र सरकारचा निर्णय : संरक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान

‘आयडीएसए’चे आता मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीड अँड ॲनालिसिस असे नामकरण करण्यात येणार आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर हे ९ नोव्हेंबर २०१४ ते १४ मार्च २०१७ पर्यंत केंद्रीय संरक्षणमंत्री होते. ते या पदावर असताना पाकिस्तानमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला होता.

पणजी : माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्‍स स्टडीज अँड ॲनालिसिसला (आयडीएसए) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांनी संरक्षणमंत्रीपद भूषविताना देशाला त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल व दूरदृष्टीमुळे त्यांचा हा सन्मान करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे.

त्यांच्या वचनबद्धतेचा आणि वारसाचा सन्मान ‘आयडीएसए’ला त्यांचे नाव देऊन करण्याचे केंद्राने हा निर्णय घेतला. हल्लीच त्यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करून सन्मान करण्यात आला होता. त्यांची दूरदृष्टी तसेच देशाचे संरक्षण करणाऱ्या दलाच्या जवानांच्या समस्या सोडविण्यात दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे काम नेहमीचे वाखाणले गेले होते. देशाचे संरक्षणमंत्री हे नेहमीच ‘आयडीएए’चे अध्यक्ष असतात. त्यामुळे या संस्थेला त्यांचे नाव दिल्याने प्रेरणा मिळत राहील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानच्या दशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी पठाणकोट व उरी येथे सर्जिकल स्ट्राईक करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या सर्जिकल स्ट्राईकच्या यशस्वीतेमुळे ते देशात प्रकाशझोतात आले होते. संरक्षण मंत्रालयात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या.

लष्करी दलामधील जवानांची ‘एक पद, एक निवृत्तीवेतन’ ही कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी त्यांनी पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारून धसास लावली होती त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सरकार तसेच दलाच्या अधिकाऱ्यांकडून प्रशंसा झाली होती. देशाच्या संरक्षणासाठी आवश्‍यक असलेला अत्याधुनिक साठा तसेच लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी व संरक्षण खर्चाचे संतुलन साधण्यासाठी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकाटकर यांच्या नेतृत्त्‍वाखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती.

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वतंत्र स्वायत्त संस्था असलेली ‘आयडीएसए’ची नोंदणीकृत १९६५ मध्ये दिल्ली येथे करण्यात आली होती. ही संस्था संरक्षण व सुरक्षेच्या सर्व बाबींवर वस्तुनिष्ठ संशोधन व धोरणात्मक संबंधित अभ्यास करते. या संस्थेने केलेल्या या अभ्यासाची दखल संरक्षण मंत्रालयामार्फत घेऊन पुढील निर्णय घेतले जातात.

...हा तर अभिमानाचा क्षण : उत्पल पर्रीकर
केंद्र सरकारने माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव ‘इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्‍स स्टडीज अँड ॲनालिसिस’ला दिले आहे ही अभिमानास्पद बाब व क्षण आहे. देशातील अशा नामांकित आणि महत्त्वाच्या संस्थेला (आयडीएसए) नाव देणे हा गोव्यातील सर्व गोमंतकियांसाठी अभिमानाचा क्षण आहे. माझ्या वडिलांनी संरक्षणमंत्री म्हणून काही काळच काम करताना देशासाठी महत्त्‍वाची भूमिका बजावली, याचा मला आनंद आहे. पंतप्रधानपदाच्या नेतृत्त्‍वाखालील या सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील कामगिरीचा प्रभाव संरक्षणातील प्रत्येक जवानावर पडेल, अशी प्रतिक्रिया पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी व्यक्त केली.

महाशिवरात्रीनिमित्त पणजीत मॅजिक ऑफ मॅडिटेशन

योगदानाचा सन्मान : मुख्यमंत्री सावंत
दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देशाच्या संरक्षणाचे काम पाहणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्‍स स्टडीज अँड ॲनालिसिस’ला देण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत करत म्हणाले, त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाबद्दल हा केंद्राने केलेला सन्मान आहे. त्यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून काम करताना अनेक स्तरावर मोठे निर्णय घेतले. त्यामुळेच अशा नामांकित संस्थेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

संबंधित बातम्या